कडवई येथे रिक्षा संघटनेच्यावतीने रॅली
संगमेश्वर : तालुक्यातील कडवई पंचक्रोशीत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रिक्षा संघटनेच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीत 80 रिक्षा सहभागी होत्या. रॅलीत ध्वनिक्षेपकावर देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. त्यामुळे वातावरण देशभक्तीमय झाले. रिक्षा संघटनेच्यावतीने तुरळ कडवई येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कडवई बाजारपेठ येथे पारंपरिक सार्वजनिक झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. सरपंच विशाखा कुवळेकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाईशा घोसाळकर हायस्कूल, महाराष्ट्र् उर्दू हायस्कूल तसेच दि इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते तसेच पथनाट्य यासह विविध देशभक्तीपर कार्यक्रम कडवई बाजारपेठ येथे सादर केले. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .
तुरळ ग्रामपंचायत कार्यालय येथेही झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये देवरुखकर शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. चिखली ग्रामपंचायत येथे सार्वजनिक झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. पंचक्रोशीतील सर्व शाळा ग्रामपंचायती तसेच सरकारी कार्यालयामधून स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.