
अल्पवयीन मुलीला कॉलेजमधून पळवून नेत विवाह केला… शारीरिक अत्याचारही केले… मावशीने तक्रार केल्यानंतर न्यायालयाने जन्मठेप आणि 27 हजारांचा दंड सुनावला
रत्नागिरी : कोल्हापूरहून रत्नागिरीत नातेवाईकांकडे राहायला येणाऱ्याने अल्पवयीन मुलीशी ओळख केली. त्यातून ती कॉलेजला गेली असताना तिला फूस लावून पळवून नेले. नंतर रत्नागिरीतील एका मंदिरात गांधर्व पद्धतीने विवाह केला. तिथून त्याने तिला कोल्हापूरला नेले व शारीरिक अत्याचार केले. यामुळे पीडिता दोन महिन्यांची गर्भवती राहिली.12 सप्टेंबरला शहर पोलिस ठाण्यात मावशीने केलेल्या तक्रारीनंतर आरोपीला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा आणि 27 हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही घटना 11 सप्टेंबर 2018 रोजी घडली होती.
विकास दिलीप जाधव (वय 24, रा. नावली, ता. पन्हाळा, कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी संशयिताविरुद्ध भा. दं. वि. कलम 363, 376 (2) (5), 376 (2) (एन) आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 3, 4 व 5,6 अन्वये गुन्हा दाखल केला होता. याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगडे करत होत्या. बुधवारी या खटल्याचा निकाल येथील विशेष (पोक्सो) न्यायालयात लागला. सरकारी पक्षातर्फे अॅड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले असून त्यांनी या खटल्यात 15 साक्षीदार तपासले. विशेष पोक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपीला 363 खाली 2 वर्षे शिक्षा व 2 हजार दंड, 376(2)(5) मध्ये 10 वर्षे शिक्षा 5 हजार दंड, 376 (2) (एन) खाली 10 वर्षे शिक्षा 5 हजार दंड, तर पोक्सो 3, 4 मध्ये 7 वर्षे शिक्षा 5 हजार दंड आणि 5, 6 खाली जन्मठेप व 10 हजार दंडाची अशी एकूण 27 हजार दंड ठोठावला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस हवालदार सोनाली शिंदे यांनी काम पाहिले.