डेरवण येथे विज्ञान महोत्सव

डेरवण : श्री  विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट, डेरवण या संस्थेतर्फे विज्ञान भारतीच्या सहयोगाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विज्ञान महोत्सव पार पडला. यामध्ये विज्ञानविषयक विविध स्पर्धा शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, वैज्ञानिक प्रकल्प, कार्यशाळा, विज्ञान विषयक चित्रपटांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम झाले. डेरवण विज्ञान महोत्सवाच्या अंतर्गत दर शनिवारी विज्ञानातील तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. नुकतेच टाटा इन्स्टिट्युट ऑफ फांडामेन्टल रिसर्च संचलित नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे संचालक डॉ. यशवंत गुप्ता यांनी डेरवण इंग्रजी माध्यम शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात डॉ. गुप्ता यांनी डोळ्यांना दिसणारी आकाशगंगा, दुर्बिणीतून दिसणार्‍या आकाशगंगा, त्या पाहण्यासाठी मोठ्या दुर्बिणींची आवश्यकता, एकाच आकाशगंगेच्या किंवा तार्‍यांच्या मिळणार्‍या वेगवेगळ्या प्रतिमा याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच भारतीय खगोल शास्त्रज्ञांचे योगदान व अंतरिक्षाचे संशोधन करणार्‍या प्राचिन ते आधुनिक दुर्बिणींच्या विकासाच्या प्रवासावरती त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाच्या अखेरीस डॉ. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करून मार्गदर्शन केले. यानंतर त्यांनी पूर्वप्राथमिक शाळा, मल्लखांब सराव, ग्रंथालय, कलादालन, संगणक कक्ष यांना भेट दिली. अटल टिकरिंग लॅबमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध वैज्ञानिक प्रकल्प तपशीलासह जाणून घेतले. विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीबद्दल त्यांचे कौतुक केले.
दरम्यान संस्थेचे ट्रस्टी विकास वालावलकर यांच्या हस्ते डॉ. गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला संचालिका शरयु यशवंतराव, सुवर्णा पाटील यांच्यासह संस्थेचे मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button