
चिपळूणमध्ये मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद
चिपळूण : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी चिपळूण रोटरी व रोटरॅक्ट क्लबच्यावतीने चिपळूण परिसरातील डॉक्टर, वकील व सीए यांच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच विविध तीन गटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी यावेळी स्पर्धा घेण्यात आली.
सांस्कृतीक केंद्र परिसरात या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. रत्नाकर घाणेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले तर श्रीराम खरे यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात झाली.
सुरक्षित व सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी रोटरी व रोटरॅक्ट क्लबच्यावतीने सोमवारी आयोजित स्पर्धेमध्ये डॉक्टर, वकील, सीए आदी क्षेत्रातील सुमारे शंभरहून अधिक स्त्री-पुरुष स्पर्धकांनी सहभाग घेतला. सांस्कृतीक केंद्र ते बहादूरशेख नाका, सांस्कृतिक केंद्र ते खेर्डी, बहादूरशेख नाका ते सती नाका अशा विविध टप्प्यात स्पर्धा झाली. स्पर्धकांनी सुदृढ व सुरक्षित आरोग्याचा संदेश देणारे टी-शर्ट परिधान केले होते. विविध गटातील या स्पर्धेत सातवीपर्यंतच्या मुलांमध्ये अनुक्रमे अथर्व दवंडे, वीर मेटवार, प्रांजल आंबेडे. मुलींमध्ये अनुक्रमे अनुजा पवार, खुमेरा सय्यद, हर्षदा जोशी. आठवी ते दहावी मुले – सिद्धनाथ जगताप, श्रेयस ओकटे, अमोल शिगवण. मुली- समिधा शितप, निधी चव्हाण, सांची पवार. खुल्या गटात पुरुष- ओंकार बैकर, सिद्धेश बर्जे, साहील आंबेडे. महिला- प्रमिला पाटील, निकिता मल्ले, अर्चना कुळे. डॉक्टरांच्या स्पर्धेत अनुक्रमे डॉ. तेजानंद गणपत्ते, डॉ. स्वप्नील दाभोळकर, एजाज अत्तार यांनी यश मिळविले. यशस्वीतांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेचे आयोजन प्रोजेक्ट चेअरमन बाबेश देवळेकर यांच्या नियोजनाखाली अध्यक्ष संजीव नायर, माजी अध्यक्ष प्रसाद सागवेकर, आसिफ पठाण, वैभव रेडीज, राजा ओतारी, मनोज जैन, रोटरॅक्टचे अध्यक्ष आकाश रेडीज व सहकार्यांनी स्पर्धा यशस्वी केली.