
मालगुंड गावात दहावी, बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी : मालगुंड गावातील स्वातंत्र्यदिनाचा सोहळा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आलेले ध्वजारोहण दहावीत शाळेत पहिला आलेल्या शुभ समीर चव्हाण तसेच बारावी कला व वाणिज्य शाखेत प्रथम आलेल्या अनुक्रमे श्रुती दुर्गवळी व वैष्णवी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
75 वा स्वातंत्र्य दिन सोमवारी मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गावागावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मालगुंड गावातही विविध कार्यक्रम घेण्यात आले. ध्वजारोहण हे नेहमी गावचे सरपंच किंवा अन्य राजकीय व्यक्तीकडून करण्याची प्रथा आहे. मात्र यंदा हा मान दहावी व बारावी कला व वाणिज्य शाखेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आला.
याबाबतचे नियोजन मालगुंड ग्रामपंचायतीने केले. मालगुंड ग्रामपंचायतीने आगळा वेगळा निर्णय घेऊन सर्व विद्यार्थ्यासमोर एक उत्तम आदर्श ठेवला. मालगुंड ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक दुर्गवळी व ग्रामविकास अधिकारी नाथा पाटील यांच्या या निर्णयाचे पंचक्रोशीतून कौतुक केले जात आहे.