खेड-पुरे खुर्दमध्ये शॉर्टसर्किटने ४० घरांचे वीजमीटर जळून खाक

0
51

खेड : तालुक्यातील पुरे खुर्द गावामध्ये ११ ऑगस्ट रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे सुमारे ४० घरांचे विजमीटर जळून खाक झाले . यामध्ये संपूर्ण घरामधील वायरींग जळून गेली आहे। टिव्ही , फ्रिज , मोबाईल आदी उपकरणांचे नुकसान झाले आहे . या घटनेला तीन दिवस झाले तरी अद्यापर्यंत नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. येथील अधिकारी जळून गेलेले विजमीटर व सर्व्हिस वायर बदलून देण्यास नकार देत आहेत . त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येथील गावदेवी मंदिराच्या लगतच मोठ – मोठ्या झाडी झुडपातून गेलेल्या विज वाहिन्यांवर शॉर्ट सर्किट झाले . यामध्ये विजेच्या तारा वितळून रस्त्यावर पडलेल्या होत्या . तर ट्रान्सफॉर्मर असलेल्या भागामध्ये मोठे स्फोटासारखे आवाज झाले . पहाटेच्या झालेल्या या प्रकाराने संपूर्ण गावामध्ये धावपळ उडाली . ज्याने त्याने आपापल्या परीने विजमीटरला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. याचवेळी येथील एका जाणकाराने मुख्य ट्रान्सफॉर्मरवरील कटआऊट प्रसंगावधान राखून बंद केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला होता . तोपर्यंत सुमारे ४० विजमीटर जळून खाक झाले होते. अधिकारी तब्बल आठ तासांनी गावामध्ये दाखल झाले होते. यावेळी केवळ एक, दोन घरांमध्ये चौकशी करून मीटरचे फोटो , मोबाईल नंबर व नाव घेवून काही क्षणातच निघून गेले . घटनेच्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत मुख्य विज वाहिन्या देखील दुरुस्त करण्यात आलेल्या नव्हत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here