
रत्नागिरीत 13 ऑगस्ट रोजी ‘एकता तिरंगा’ रॅलीचे आयोजन
रत्नागिरी : 13 ऑगस्ट रोजी रत्नागिरीत ‘एकता तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दुचाकी आणि रिक्षा यांची भव्य रॅली रत्नागिरीत निघणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. या रॅलीमध्ये तमाम रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
देशभरात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ हा कार्यक्रम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. रत्नागिरीतदेखील एखादा भव्य कार्यक्रम व्हावा, अशी मागणी होत असताना जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी रत्नागिरीती सामाजिक संघटनांना आवाहन केले होते. त्यानुसार रत्नागिरीतील विविध सामाजिक संस्थांनी पुढे येऊन भव्य रॅलीचे आयोजन केले आहे.
रत्नागिरीत 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातून या रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल यासह सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. या रॅलीसाठी मराठी पत्रकार परिषद, हेल्पिंग हॅण्ड, श्री रत्नागिरीचा राजा गणेशोत्सव मंडळ व व्यापारी संघटना यांनी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरीकरांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, या रॅलीला सकाळी 8.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरुवात होणार आहे. ही रॅली बसस्थानक, राम आळी, गोखले नाका, काँग्रेस भवन, प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजारमार्गे बसस्थानक, जयस्तंभ येथून मारुती मंदिर येथे जाणार आहे. तेथून ही रॅली पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येणार असून संविधानाची शपथ घेऊन या रॅलीची सांगता केली जाणार आहे.