मंगळवारी ऑगस्ट क्रांतीदिनी‘१९४२चिपळूण’चे प्रकाशन होणार

0
23

चिपळूण : येथील स्वातंत्र्यसैनिकांनी ७ सप्टेंबर १९४२ रोजी शहरात मिरवणूक काढून सत्याग्रह केला होता. गांधी चौकात भाषणे झाली होती. त्यानंतर पोलीस आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्यात संघर्ष झाला होता. या सत्याग्रहात तेवीस सत्याग्रही कारावासात गेले होते. त्यातील पाच जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली होती. न्यायालयात या सत्याग्रहींची बाजू तत्कालिन नामवंत वकील सोबळकर यांनी मांडली होती. न्यायालयाने दिलेल्या याबाबतच्या निकालपत्राची प्रत वाचनालयाला उपलब्ध झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षात ‘लो.टि.स्मा.’ वाचन मंदिराच्या आप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्रातर्फे येत्या मंगळवारी (दि. ९) ऑगस्ट क्रांतीदिनी ‘१९४२चिपळूण’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

स्वातंत्र्य आंदोलन काळात चिपळूण येथील सत्याग्रहात पोलिसी लाठी हल्ल्याविरुद्ध झालेल्या हल्ल्यात दाखल झालेले आरोपपत्र (चार्जशीट) आणि त्यावरील रत्नागिरी येथील सेशन कोर्टाचा वाचनालयाकडे संग्रहित असलेला निकाल माजी अध्यक्ष कै. तात्या कोवळे यांनी मिळवला होता. हा खटला चिपळूण येथील मामलेदार लांबाते यांचेसमोर चालला होता. विशेष म्हणजे १९६३ साली ज्यांनी काही दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले त्या कै. पी. के. सावंत यांचे वडील कृष्णाजी सावंत हे तेव्हा पोलीस हेडकाँन्स्टेबल होते. या संघर्षात त्यांना व त्यांच्या समवेत असलेल्या पोलिसांना मारहाण झाली होती. रत्नागिरीचे सेशन जज्ज एन. एम. मियाभॉय यांनी १० मे १९४३ रोजी याबाबत निकाल दिला होता. तेवीस पैकी पंधरा जणांना मुक्त करण्यात आले होते. आठ जणांना शिक्षा झाली होती. ‘१९४२चिपळूण’ हे संपादित पुस्तक त्याचे मराठी भाषांतर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास सविस्तर साधनासाहित लिहिण्याचा दृष्टीकोन समोर ठेवून इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. मूळ इंग्रजी निकालपत्राचे भाषांतर शालन रानडे यांनी केले आहे. पुण्याच्या दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. याच्यातर्फे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. ‘लोटिस्मा’ने हे पुस्तक देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या अपरान्तातील स्वातंत्र्यवीरांना अर्पण केले आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ‘अपरान्त’भूमीचे योगदान अमूल्य आहे. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांची जन्मभूमी रत्नागिरी जिल्हा आहे. चिपळूण सत्याग्रहात कारावासात गेलेल्या तेवीस सत्याग्रहींपैकी ज्ञानू बळवंत देशमुख, सीताराम भिकू कन्हाळ, गोपाळ लक्ष्मण लवेकर, नारायण रामचंद्र वेल्हाळ, रामकृष्ण महादेव गांधी, अनंत नारायण हटकर, सदाशिव विठ्ठल शेट्ये, रामकृष्ण सखाराम रेडिज यांना शिक्षा झाली होती. तर जनार्दन गोपाळ वेल्हाळ, महादेव गोपाळ कापडी, श्रीकृष्ण तुकाराम कोलगे, अनंत सीताराम कोलगे, सीताराम विष्णू आवले, परशुराम विष्णू आवले, गोपाळ नारायण राऊत, विठोबा शंकरशेठ टाकळे, सीताराम महादेव खातू, नथुराम त्र्यंबक वाडेकर, विठोबा पुंडलिक चौधरी, महादेव सीताराम जागुष्टे, भिकू गोपाळ विंचू, कृष्णाजी महादेव बापट, रघुनाथ गोविंद रेडिज यांची सुटका झाली होती. या पुस्तक प्रकाशन सोहोळ्यात तेवीस देशभक्तांच्या कुटुंबाचा प्रतिकात्मक सन्मान केला जाणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन आमदार शेखर निकम यांच्याहस्ते होईल. ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक ‘कोकण मिडिया’चे संपादक प्रमोद कोनकर हे समारंभाचे अध्यक्ष असतील.

या निमित्ताने कोकणातील दिनकरशास्त्री कानडे, केशवराव जोशी, मोहन धारिया आदी पाच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची तैलचित्रे कलादालनात लावण्याचा निर्णय वाचनालयाने घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण सत्याग्रहात कारावासात गेलेल्या तेवीस देशभक्त सत्याग्रहींच्या वंशजांनी, कुटुंबीयांनी ‘लोटिस्मा’शी संपर्क साधावा. वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास चिपळूणवासियांनी उपस्थित राहून देशभक्तांना मानवंदना द्यावी, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here