रत्नागिरीत पोषण आहारासाठी नगर परिषदेने नेमले पथक
रत्नागिरी : शहरातील नगर परिषदेच्या शाळा आणि आठवीपर्यंतच्या खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना पोषण आहार वेळेत मिळावा आणि या आहाराची गुणवत्ता चांगली असावी यासाठी रत्नागिरी नगर परिषदेचे एक पथक नेमण्यात आले आहे. उपमुख्याधिकारी प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली कर प्रशासकीय अधिकारी आय. व्ही. चाळके आणि मालमत्ता पर्यवेक्षक नंदकुमार पाटील या तीन अधिकार्यांचे हे पथक आहे. रत्नागिरी शहरातील सुमारे साडेसात हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी स्थानिक तीन युनिट नेमण्यात आले आहेत. या युनिटमध्ये एक बचतगटसुद्धा आहे. गेल्या सोमवारपासूनच पोषण आहार वाटप सुरू झाले आहे. पोषण आहार वाटपाची सुरूवात असल्याने ते काही शाळांमधील विद्यार्थ्यांना वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर लगेचच पथक ठेकेदारांच्या स्वयंपाक गृहांना भेटी देतात. नगर परिषदेच्या या पथकाने नुकतीच क्रांतीनगर अंगणवाडी येथे असणार्या स्वयंपाक गृहाला भेट दिली. तेथील भात आणि वरणाची चवही घेतली. एसटी स्टँड येथील गोदुताई जांभेकर महिला विद्यालयातीलही विद्यार्थी आणि शिक्षकांची भेट घेऊन पोषण आहाराबाबत विचारणा
केली.