‘हर घर तिरंगा’ मोहीम : देवरूखमध्ये शिवसेनेचा भाजपवर आक्षेप

0
44

देवरूख : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ ही मोहीम सगळीकडे राबवण्यात येत आहे. संगमेश्‍वर तालुक्यात ही मोहीम वादात सापडली आहे. संगमेश्‍वर तालुक्यात भाजपाने मोहिमेचा रथ तयार करून त्यावर स्थानिक नेत्यांचे फोटो लावले आहेत, असा आरोप करत भारतीय ध्वज संहिता 2006 भाग 3 च्या कलम 9 चे उल्‍लंघन केले आहे. यावर त्वरित कारवाई करावी, अशी तक्रार शिवसेनेने प्रशासनाकडे केली आहे. राष्ट्रीय पक्षाकडून स्वत:च्या प्रसिद्धीसाठी तिरंगा फिरवला जात आहे. या रथाचे स्वरूप पाहता यामध्ये राष्ट्रप्रेमाचा अभाव व पक्ष प्रेम जास्त दिसून येत आहे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.
या रथावर पक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्ते यांच्याच फोटोचा भरणा दिसून येत आहे. ही बाब निंदनीय आहे. भारतीय ध्वज संहिता 2006 भाग 3च्या कलम 9 मध्ये प्रदान केलेल्या वाहनाशिवाय कोणत्याही वाहनावर ध्वज फडकविण्यास सक्‍त मनाई आहे. असे असतानाही कायद्याचे उल्‍लंघन करून हा राष्ट्रीय ध्वज लावला गेला आहे. या रथावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संगमेश्‍वर तहसीलदार सुहास थोरात यांना हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तालुकाप्रमुख प्रमोद पवार, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, माजी पं. स. सभापती नंददीप बोरूकर, इस्त्यिाक कापडी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here