जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि त्या अंतर्गत येणार्या ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात जाज्वल्य देशाभिमानाने आणि उस्फूर्तपणे साजरा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. परंतु जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या उत्सवामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर उपस्थित होते.
यावेळी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमामध्ये जिल्हावासियांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कोणते उपक्रम राबविण्यात येणार आहेत याची माहिती जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 4 लाख 30 हजार कुटुंब आणि 70 हजार शहरी भागातील कुटुंबांचा समावेश असलेले हे हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची तयारी जिल्हा प्रशासनाने 13 जुलै पासुनच करण्यास सुरुवात केली असून शासकीय आस्थापना बरोबरच सामाजिक, स्वयंसेवी संस्था, शिक्षण विभाग आदींचा यात सहभाग आहे. या उपक्रमासाठी शिक्षण विभाग आपल्या शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.