गिम्हवणेेे येथे प्रौढाची विहिरीत उडी मारून आत्महत्या
दापोली : दापोली तालुक्यामधील गिम्हवणे उगवतवाडी येथील अनिल भुवड (वय 48) या प्रौढाने गिम्हवणे शाळेजवळील गणपती विसर्जन करण्याच्या विहिरीत आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. 30 जुलै रोजी संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत दापोली पोलिस ठाण्यात मयताचा भाऊ सुनील भुवड याने दिलेल्या फिर्यादीनुसार अनिल भुवड हे कोकण कृषी विद्यापीठ येथे नोकरीला होते. त्यांचे पत्नीसोबत पटत नसल्यामुळे गेले वीस वर्ष ते त्यांना सोडून राहत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोकण कृषी विद्यापीठ येथील कामाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांचे दारू पिण्याचे प्रमाणही वाढलेले होते. त्यामुळे आजारपण व अशक्तपणा वाढला होता. दि. 30 जुलै रोजी सकाळी घरी कोणालाही न सांगता 8:30 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. दुपारी 4.40 वाजण्याच्या सुमारास गिम्हवणे येथील जगदीश शिगवण यांनी फोन करून सुनील भुवड यांना गिम्हवणे शाळेजवळ बोलाविले. तेथे जाऊन पाहिले असता अनिल भुवड याचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. अनिल भुवड याने दारूच्या नशेत असताना विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खबर सुनील भुवड यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिलेली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.