बारव जतन- संवर्धनासाठी लोकांनी पुढे यावे
चित्रात दिसतो तसा एखादा पाणवठा तुमच्या गांवात अथवा आसपास आहे का? कुठे अन्यत्र तुमच्या पाहण्यात आला आहे का? तसे असेल तर ‘महाराष्ट्र बारव मोहिमे’त तुमच्या निरीक्षणाला, माहितीला नक्कीच स्थान मिळेल. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत पावणेदोन हजारांहून अधिक बारवांचा शोध घेतला असून जलसाठ्यांचे हे प्राचीन वारसे जतन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यभर सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.
अलीकडेच ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही चळवळ सुरू करणारे मुंबईनिवासी रोहन काळे यांचा उल्लेख करून या विहिरी म्हणजे भारतीय संस्कृतीच्या वारशाचा एक पैलू असल्याचे सांगितले. व्यवसायाने ‘मनुष्यबळ’ (एचआर) क्षेत्रात कार्यरत असलेले रोहन काळे २०२० च्या प्रारंभापासून अशा विहिरी आणि तळ्यांचा शोध घेऊन अभ्यास करत आहेत.
‘स्टेपवेल’ या इंग्रजी नांवाने ओळखल्या जाणाऱ्या बारवा अर्थात पायऱ्यांच्या विहिरी किंवा तलाव हा भारतातील आणि महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक ठेवा आहे. प्राचीन काळापासून हे पाणवठे तेथील लोकवस्तीची, गाईगुरांची आणि वाटसरूंची तहान भागवत आले. आजही त्यातील अनेक विहिरी अथवा तलावांचा वापर स्थानिक पाणीपुरवठा योजनांसाठी केला जात आहे. अशा साठ्यांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र स्टेपवेल कॅम्पेन’ (महाराष्ट्र बारव मोहीम) सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक काळातील बारवांचा शोध घेऊन त्यांचे पुनरुज्जीवन करणे, जतन आणि संवर्धन करून त्यांचा अभ्यास करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट ‘महाराष्ट्र बारव मोहिमे’ने स्वीकारले आहे. या आजही उपयुक्त ठरणाऱ्या जलसाठ्यांच्या जपणुकीविषयी जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी ‘महाराष्ट्र बारव महोत्सव’ साजरे केले जातात. त्यामध्ये पारंपरिक दिव्यांच्या ज्योती लावून ‘बारव’ वर्गात समाविष्ट होणाऱ्या पायऱ्यांच्या विहिरी अथवा तलावांचा परिसर उजळून टाकला जातो.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बारवांचा मागोवा घेणारे स्वयंसेवक कार्यरत असून आतापर्यंत अशा प्रकारच्या १७५० हून अधिक जलसाठ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. जिल्हावार आकडेवारी पाहता पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २१४ बारवा सापडल्या असून त्यापाठोपाठ अहमदनगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत प्रत्येकी १७९ बारवा आढळल्या आहेत. शंभराहून अधिक बारवा निदर्शनास आलेले सातारा (१५७) आणि सोलापूर (१०१) हे आणखी दोन जिल्हे आहेत. साधारणपणे महाराष्ट्राच्या पश्चिम आणि उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये जास्त संख्येने बारवा दिसून आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील १७९ पैकी सर्वाधिक म्हणजे ७५ बारवा रत्नागिरी तालुक्यात, त्यापाठोपाठ गुहागर तालुक्यात ३३ आहेत. दापोली (१६), संगमेश्वर (१५), लांजा- राजापूर (प्रत्येकी १३), चिपळूण (१२) आणि खेड (२) अशी बारावांची संख्या आहे. मंडणगड तालुक्यात अद्याप एकही बारव दिसून आली नाही.
काही शे अथवा काही हजार वर्षांपूर्वी निरनिराळ्या प्रकारे बांधकाम करण्यात आल्याचे दिसते. रचना आणि आकारावरून यांचे पायऱ्यांची विहीर (step well), पायऱ्यांची तळी (step tank), कुंड (pond), पुष्करणी (देवड्या असलेली शोभिवंत विहीर), पोखरण (देवळानजीकची पायऱ्यांची विहीर) आणि वर्तुळाकार उतरत्या पायऱ्यांची विहीर (helical step well) असे प्रकार पाडण्यात आले आहेत. शेवटच्या प्रकारातील विहीर परभणी येथे आढळते, या प्रकारची ती महाराष्ट्रातील एकमेव विहीर आहे.
या विहिरी, तळी आणि पाणवठ्यांना बोलीभाषेत निरनिराळ्या नावांनी ओळखले जाते. पांडवकालीन विहीर, शिवकालीन तळी हे शब्द सर्रास वापरले जातात. याशिवाय पोखरबाव, आड, घोडेबाव हीदेखील प्रचलित नांवे आहेत.
बारवांचा शोध घेऊन त्यांचे राज्यपातळीवर दस्तावेजीकरण करणे हे मोहिमेचे प्रधान उद्दिष्ट आहे. त्यांचे जमिनीवरून आणि ड्रोनच्या सहाय्याने छायाचित्रण करणे, आणि वारसा स्थळे म्हणून नोंद करणे याबरोबरच ग्रामीण जनता आणि विद्यार्थ्यांचा सहभाग मिळविण्याचेही उद्दिष्ट आहे. बारवांच्या रचनात्मक अभ्यासाकरिता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या निःशुल्क सहली आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची रुची उत्पन्न करण्याचाही प्रयत्न आहे.
दुर्मिळ अथवा अन्यत्र फारशा न आढळणाऱ्या प्रकारातील बारवांचा शोध घेण्यास ग्रामीण जनतेला प्रेरित करण्याचाही प्रयत्न मोहिमेंतर्गत सुरू आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी याचा उपयोग होईल. ग्रामस्थ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी बारवांच्या जपणुकीसाठी राबविलेल्या चांगल्या योजनांच्या माहितीचा वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमांद्वारे प्रसार करणे; आणि एकूणच बारवांच्या जतन- संवर्धनासाठी लोकसहभाग मिळविणे यासाठी मोहिमेचे कार्यकर्ते राज्यभर प्रयत्न करत आहेत. आपल्या पूर्वजांनी दूरदृष्टीने निर्माण केलेल्या या अमूल्य वारशाचे जतन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन या मोहिमेचे रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते श्रीरंग मसुरकर (८८८८४६६८२४) यांनी केले आहे.
www.konkantoday.com