खेडमध्ये पालिकेच्या जागांवर अतिक्रमण वाढले
खेड : शहरात पालिकेच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून अनधिकृतपणे बांधकामे सुरू आहेत. पालिकेच्या प्रशासक व खेडच्या उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे व मुख्याधिकारी प्रमोद धोरजकर हे डोळेझाक करत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्यामुळे कुंपणच शेत खात आहे का? असा संशय आता नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
खेड शहरात बसस्थानक परिसर, सुपरमार्केट गल्ली, भरणे – खेड मार्ग, समर्थ नगर येथील पालिकेच्या कर्मचारी वसाहती समोरील मोकळ्या जागेत, महाडनाका येथील पालिकेच्या जीर्ण इमारती समोर, प्रबोधनकार ठाकरे उद्यानाच्या बाजूच्या व्यापारी संकुलाच्या परिसरात, शहरात मध्यवर्ती ठिकाणी पालिकेच्या भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुल परिसरात, खेड नगर वाचनालयाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. यातील बहुतांश बांधकामे राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींनी केली असून पालिकेत सध्या कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसला तरी पालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहे.
पालिकेत प्रशासक नियुक्त झाल्यानंतर पालिका क्षेत्रात अनागोंदी कारभार वाढल्याचे चित्र आहे. पालिकेकडून शहरात जे लोक सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करत आहेत, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे शासकीय भूखंड म्हणजे स्वत:ची मालमत्ता समजून अनेक जण त्यावर आपल्या दुकानांचे इमले उभे करत आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
खेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम तत्काळ राबवली न गेल्यास भविष्यात ही अतिक्रमणे अनेक समस्या उभ्या करणार आहेत. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी सौ. मोरे यांना कारवाईचे आदेश जिल्हाधिकार्यांनी द्यावे, अशी मागणी खेडचे नागरिक करत आहेत.