स्पर्धा परीक्षेतही विद्यार्थ्यांनी यश मिळवावे : शिक्षणाधिकारी सावंत; फाटक हायस्कूलमध्ये सत्कार समारंभ
रत्नागिरी : कोकण मंडळात राज्यात आपले विद्यार्थी प्रथम असताना येथील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे नकोत. त्यासाठी प्रयत्न करून यश मिळवावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी केले.
येथील फाटक प्रशाला आणि विनायक सदाशिव गांगण कला, वाणिज्य आणि कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, ज्या शाळेत शिकलो तेथे होणारा सत्कार महत्त्वाचा असतो. कोविड काळातदेखील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मेहनत घेतली. त्यामुळे शाळेचा निकाल उत्तम लागला. शालेय जीवनात मल्टीटास्किंग शिकता आले पाहिजे, कष्ट करण्याची जिद्द, वाचन असेल तर निश्चितच पुढे जाऊ शकता. डॉक्टर, वकील, अभियंता ही फक्त क्षेत्रे न धरता स्पर्धापरीक्षा या क्षेत्राचेही उद्दिष्ट ठेवा.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक किशोर लेले यांनी प्रास्ताविक केले. दहावीतील प्रथम तीन विद्यार्थी, तसेच प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमधून प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्कृतच्या शिक्षिका मंजिरी आगाशे, इतिहासाचे शिक्षक अनंत जाधव, भूगोलाचे शिक्षक अजित चवेकर तसेच नीलेश पावसकर यांचा राष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धेत रजत पदक मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अनुष्का करमरकर, मानस सिधये, आर्या अभ्यंकर, केयूर कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मंजिरी आगाशे, अनंत जाधव हे शिक्षक तसेच पालकांच्या वतीने मानसी कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक राजन कीर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन नेत्रा आपटे यांनी केले.