रत्नागिरी जिल्ह्यात उभारणार वैद्यकीय महाविद्यालय; समितीने केली पाहणी
रत्नागिरीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असून नुकताच या संदर्भात एका समितीने जागा व रुग्णालयाची पहाणी केली.
रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे प्रयत्नशील होते. मागील सरकारमध्ये त्यांनी जागा व अन्य बाबी विचारात घेऊन प्रस्तावही दिला होता. मात्र सिंधुदुर्गतील वैद्यकीय महाविद्यालयाला त्यावेळी प्राधान्य देण्यात आले. सत्ता बदलानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान होताच त्यांनी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्या अनुषंगाने समितीने रत्नागिरीत येऊन जिल्हा रुग्णालय व येथील सुविधांची पाहणी केली. त्यानंतर कापडगाव येथील 20 एकर जागेचीही पाहणी केली. या समितीमध्ये दोन वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश होता.
प्रथम जिल्हा रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले जाईल. त्यानंतर तीन-चार वर्षानी कापडगाव येथे सर्व सोयीनीयुक्त महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. आ. उदय सामंत यांनी यात विशेष लक्ष घातले असून, जिल्हा रुग्णालय व अन्य ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांना जाणवणार्या डॉक्टरांचा प्रश्न त्यामुळे सुटू शकणार आहे.