राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असणार्या मंडणगड ते पाचरळ रस्त्याची खड्ड्यांनी चाळण
मंडणगड : राष्ट्रीय महामार्ग असा कागदावर दर्जा धारण करणार्या आंबडवे-लोणंद या रस्त्याच्या विविध समस्यांमुळे तालुकावासीयांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. चिंचाळी ते शेनाळे ही दोन गावे याचबरोबर मंडणगड ते पाचरळ या दोन गावाच्या आवारात सुमारे चौदा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील सर्वाधिक वाहतूक या रस्त्यावरुन सुरु आहे, त्यामुळे समस्येची तीव्रता अधिकच वाढली.
रोड कनेक्टिव्ही रहावी याकरिता प्रशासन प्रत्येक पावसाआधी प्राधिकरणास अर्लट करतात. म्हाप्रळ ते शेनाळे दरम्यानचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्राधिकरणाने मे महिन्याच्या उत्तरार्धात ठेकेदारास भाग पाडले. मात्र, हे काम दर्जाहीन झाले असून, महामार्गवर ठिकठिकाणी पाणी भरले. पूर्ण रस्त्याला अनेक ठिकाणी गटार व साईडपट्टी नाही व घाट परिसरात वळणदार रस्त्यावर वाढलेली झाडे वाहतुकीस अडचण निर्माण करत आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा अधिक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात प्राधिकरणाकडे स्थानिक नागरिक वांरवार तक्रार करीत आहेत. मात्र, प्राधिकरणाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
यंदा पावसाआधी काँक्रिटीकृत रस्ताचा घाट घालण्यात आला. जो काही रस्ता पूर्ण करण्यात आला त्यावर खाडीतील खारे पाणी मारण्यात आल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. प्राधिकरणाकडे जाण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेला पूर्वीचा रस्ता बरा होता, अशी प्रतिक्रिया तालुक्यातील नागरिकांमधून व्यक्त केली जाऊ लागली आहे. पावसाचे चार महिने सोडले तर जनता कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जुळवून घेते. मात्र, पावसात समस्यांची मालिकाच निर्माण होते. याकडे वरिष्ठ लक्ष देणार आहेत का? असा प्रश्न तालुकावासीयांना पडला
आहे.