सेवा शुल्क लागू केल्यास भरावे लागणार जादा पैसे; काँग्रेसची चिपळूण नगर परिषदेवर धडक
चिपळूण : नगर परिषदेने चालू वर्षाच्या घरपट्टीत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सेवा शुल्क लागू केला आहे. त्यानुसार वर्षाकाठी घरमालकाला 480 रूपये, तर व्यावसायिक गाळे धारकांना 960 रूपये भरावे लागणार आहेत. त्याला नागरिकांचा विरोध असल्याने कोणत्याही परिस्थितीत हे सेवा शुल्क रद्द करावे, अशा मागणीसाठी काँग्रेसने चिपळूण नगर परिषदेवर गुरूवारी धडक दिली. तसेच हे सेवाशुल्क रद्द न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला.
राज्य शासनाने सर्व नगर परिषदांना घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सेवा शुल्क आकारावा, असा आदेश दोन वर्षांपूर्वी दिला होता. मात्र गतवर्षी या आदेशानुसार अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला असताना त्यावर तत्कालीन सदस्यांनी आक्षेप घेत विरोधी ठराव केला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव व शहराध्यक्ष लियाकत शाह यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी नगर परिषदेवर धडक दिली.
यावेळी यादव व शाह यांनी या सेवा शुल्काला कडाडून विरोध केला. या सेवाशुल्काला शहरवासीयांचा मोठा विरोध आहे. यावर मुख्याधिकारी शिंगटे म्हणाले, गतवर्षी तत्कालीन पदाधिकार्यांनी हे सेवाशुल्क रद्दचा ठराव केला होता. मात्र शासनाने पुन्हा त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील सर्वच नगरपालिका, नगरपंचायतींना हा नियम लागू केला आहे. याबाबतच्या नागरिकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवल्या
जातील.
यावेळी इब्राहीम दलवाई, सुरेश राऊत, कांता चिपळूणकर, सुरेश पाथरे, यशवंत फके, माजी नगरसेवक कबीर काद्री, सफा गोटे, करामत मिठागरी, शकील तांबे, राकेश दाते, श्रद्धा कदम, अश्विनी भुस्कुटे, फैसल पिलपिले, गुलजार कुरवले, मनोज दली, कैसर देसाई, संदीप आग्रे आदी उपस्थित होते.