
मुंबईत शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून सागरी मार्ग २४ तासांसाठी खुला!
मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून सागरी किनारा मार्ग बांधण्यात आला आहे. हा सागरी किनारा मार्ग आतापर्यंत सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंतच वाहतुकीसाठी खुला आहे. पण आता मात्र शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून हा सागरी मार्ग २४ तासांसाठी खुला राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुख्यालयात आयोजित विविध प्रकल्पाच्या उदघाटन आणि लोकार्पण सोहळ्यात केली.
एमएमआरडीएच्या सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरणाअंतर्गत वाकोला नाला ते पानबाई शाळा उन्नत रस्ता, धारावी ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दिशेने जाणारा उड्डाणपूल, मंडाले मेट्रो प्रशिक्षण केंद्र, मालवणी मेट्रो कर्मचारी निवासस्थान आणि सागरी किनारा मार्गातील ५.२५ किमीच्या विहार पथाचे उद्घाटन आणि लोकार्पण गुरुवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएच्या बीकेसी मुख्यालयात पार पडले. पालिकेकडून शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या टोकापर्यंत असा १०.५८ किमीचा सागरी किनारा मार्ग बांधण्यात आला आहे. हा सागरी मार्ग सध्या सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला असतो. सागरी सेतू २४ तासांसाठी खुला करण्याचे नियोजन मागील काही दिवसांपासून पालिकेकडून सुरु होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी रात्री १२वाजल्यापासून सागरी मार्ग २४ तासासाठी खुला होईल असे जाहिर करत वाहनचालक-प्रवाशांना मोठा दिलासा दिला. तर सुंदर आणि जलद प्रवासाचा पर्याय असलेला सागरी मार्ग २४ तास सेवेत दाखल झाल्यानंतर वाहनचालकांनी गाडी चालविण्याचे कौशल्य, प्रात्यक्षित दाखवू नयेत. अनेक जण सागरी मार्गावर कसरती करतात, शर्यत लावतात अशा तक्रारी आहेत. पण आता वेगमर्यादेचे पालन न करता गाडी चालवल्यास तुमच्या घरी नोटीस येईल, दारात पोलीस येतील आणि कारवाई करतील अशी ताकीद मुख्यमंत्र्यांनी वाहनचालकांना दिली. किनारा मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्यांचे तुमच्यावर लक्ष असेल असेही ते म्हणाले.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडत प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या कपाडीयानगर ते वाकोला, पश्चिम द्रुतगती उन्नत रस्ता प्रकल्पातील वाकोला नाला ते पानबाई शाळा उन्नत रस्त्याच्या कामाचे कौतुक यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. देशातील सर्वाधिक, १०० मीटर त्रिज्येच्या तीक्ष्ण वक्रता असलेला केबल स्टेड पूल म्हणजे अभियांत्रिकी आविष्कार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मुंबईतील वाहतूकीपैकी ६० टक्के वाहतूक ही पश्चिम द्रतगती महामार्गावरील आहे. अशावेळी या उन्नत रस्त्यामुळे आणि एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. दरवर्षी ५० किमीचे मेट्रोचे जाळे वाहतूक सेवेत दाखल झाले पाहिजे, पुढच्या वर्षी किमान ६०-७० किमीचे मेट्रोचे जाळे सेवेत दाखल करा अशी सूचनाही त्यांनी यावेळी एमएमआरडीएला दिली. त्याचवेळी मुंबई, एमएमआरच्या कोणत्याही टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत केवळ ५९ मिनिटात पोहचता यावे यासाठी मुंबई ५९ मिनिटांत ही संकल्पना आणण्यात आली आहे. त्यानुसार एमएमआरभोवती रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, मेट्रो, सागरी मार्ग, सागरी सेतू अशा प्रकल्पाचे वर्तुळ निर्माण केले जाणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात मुंबई ५९ मिनिटात हे स्वप्न प्रत्यक्षात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वरळी बीडीडीत म्हाडाकडून बांधण्यात आलेल्या पुनर्वसित इमारतीच्या कामाचे कौतुक या कार्यक्रमातही मुख्यमंत्र्यांनी केले.
वडाळा ते गायमुख मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये
मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करत मुंबईकरांचा प्रवास अतिजलद करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्यानुसार सुरु असलेल्या मेट्रो प्रकल्पातील अधिकाधिक मेट्रो मार्गिका शक्य तितक्या लवकर सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. मेट्रो २ब (अंधेरी पश्चिम ते मंडाले) मार्गिकेतील पहिला टप्पा सप्टेंबरअखेरीस तर मेट्रो ४, ४ अ (वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख) मधील पहिला टप्पा डिसेंबरमध्ये आणि मेट्रो ९ (दहिसर ते मिरा-भाईंदर) मार्गिकेतील पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल होईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहिर केले.
तिकीट दरवाढ न करता वातानुकुलित लोकल
उपनगरीय रेल्वेवरील ताण वाढला असून काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे रेल्वे दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर मेट्रोप्रमाणे रेल्वे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसविण्याची मागणी होत होती. त्यानुसार लोकलचे डबे मेट्रो सारखेच करण्यात येणार असून लवकरच त्याबाबतची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री करतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हे बदल करताना, वातानुकुलित लोकलच्या प्रवाशांवर तिकीट दरवाढीचा भार टाकू नये अशी मागणी आम्ही केंद्रीय मंत्र्यांकडे केली होती ती त्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे कोणतीही तिकीट दरवाढ न होता मेट्रोसारखी सेवा लोकलमध्येही मिळणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहिर केले.
मुंबईचा विकास अतिवेगाने करण्यासाठी महायुती कटीबद्ध आहे. त्यानुसार विकास सुरु आहे. मुंबईतील प्रकल्प हे केवळ कमाल नाही तर ते सुरक्षित प्रवासाची हमी असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे आपण बारामतीत दर्जेदार रस्ते बांधले असून सुशोभिकरणही केले आहे. सुट्टीच्या दिवशी जाऊन मुखर्जी आणि गगराणी यांनी हे काम पाहून यावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. पर्यावरणपूरक विकास करण्याकडे महायुतीचा भर आहे. त्यानुसारच अटल सेतूसारखा प्रकल्प साकारण्यात आला असून यापुढेही अशाचप्रकारे प्रकल्प राबविण्यात येतील अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.