
काय ती तुटलेली शेड, काय ती असुविधा, काय तो मनस्ताप.कोकण रेल्वेच्या संगमेश्वर स्थानकाची ही आजची दारुण स्थिती!
कोकण रेल्वेच्या संगमेश्वर रेल्वे स्थानकाची याच महिन्यात २ जुलैला कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शेड आणि इतर सुविधांची पाहणी केली होती. पण त्यांची पाठ वरून १५दिवस उलटले तरी परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे. कोणाला काही पडलेलं नाही. प्रवासी कितीही ओरडू देत, ऊन असो की पाऊस, कोणाला कसली जबाबदारीची जाणीव नाही. या स्थानकात असणाऱ्या फलाट २ वरची प्रवासी निवारा शेड कौले तुटल्याने दयनीय अवस्थेत आहे. ही तुटलेली कौले कधीही कोसळून प्रवाशांवर अपघाताचा प्रसंग येऊ शकतो. अशा दुर्घटना टाळायच्या असतील तर त्वरित, किमान गणेशोत्सवापूर्वी तरी ही शेड दुरुस्त होईल का असा प्रश्न कोकण रेल्वेच्या संगमेश्वरवासी प्रवाशांना पडला आहे.

