फ्लॅट आणि कामाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
रत्नागिरी : फ्लॅट आणि काम देण्याचे आमिष दाखवून महिलेची ३ लाख ५० हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळून त्याला शनिवारी (दि.१६ जुलै) न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश अशोक मुरकर (रा. मागलाड फणसोप, रत्नागिरी ) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात साक्षी अमोल पाटील (वय 36, रा. विमानतळ, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, 30 ऑक्टोबर ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीत अमोलने साक्षी पाटील यांचा विश्वास संपादन करून फ्लॅट आणि काम मिळवून देतो असे सांगत त्यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये उकळले. दरम्यान, पैसे देऊनही फ्लॅट आणि काम यातील काहीच न मिळाल्याने साक्षी पाटील यांनी अमोलला याबाबत वारंवार विचारणा केल्यावर त्याने टाळाटाळ करत होता. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.