खेडमध्ये चोरट्यांचा मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश; सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
खेड : कंपनीत चोरी करणार्या चोरट्यांच्या मुसक्या खेड पोलिसांनी आवळल्या आहेत. लोटे एमआयडीसी येथील पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर्स प्रा.लि. युनिट कम्पनीत ही चोरी झाली. 7 लाख 70 हजार 90 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
ॠतिक रामदास आंब्रे (वय 22), दर्शन दिलीप गायकवाड (वय 21), सोहम संतोष आंब्रे (वय 21), साबिर शेख, अजिंक्य अजित आंब्रे (वय 24), दिवेश आंब्रे (वय 21, सर्व रा. खेड, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलिस कोठडी सुुनावली आहे.
याबाबत विकी बालाजी सुर्यवंशी (वय 29,रा.मूळ रा.लातूर सध्या राहणार खेड, रत्नागिरी) यांनी खेड पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीत 9 जुलै 2022 रोजी मध्यरात्री 2 ते 3 वा.सुमारास चोरी झाली होती. पोलिसांनी संशयितांना अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद, खेड पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.बी.कदम करत आहेत. तसेच हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे,पोलिस शिपाई रुपेश जोगी, सुनिल पडळकर, विनायक येलकर, विशाल धाडवे व चालक पोलिस शिपाई रोहित जोयशी यांनी सहभाग घेतला होता.