परशुराम घाटात दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी वर्षभराने नऊ जणांवर गुन्हा दाखल
चिपळूण : परशुराम घाटाच्या खालील बाजूस असलेल्या पेढे, परशुराम येथील नागरी वस्तीत 22 जुलै 2021 रोजी मोठ्या प्रमाणात पाण्याच्या लोंढ्यासह दरड येऊन नागरी वस्तीतील घरांसह संबंधित ठिकाणच्या रहिवाशांची आर्थिक व जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामध्ये पेढे कुंभारवाडीतील सहा घरे जमिनदोस्त झाली. तसेच एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. यामध्ये एक महिला व एका पुरुषाचा समावेश होता. एक महिलाही गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेला जबाबदार धरून संबंधित कंपनी व शासकीय अधिकार्यांविरोधात वर्षभराने चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत बांगर, अमोल माडकर, ठेकेदार कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लि. चे तत्कालीन अधिकारी, मॅनेजिंग डायरेक्टर राजेश गर्ग, अमितकुमार गर्ग, टिकमचंद गर्ग (डायरेक्टर), अंकित दिनेश चौरासिया, विवेक गोयल, ज्योती सोनी (डायरेक्टर) अशा नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावरील परशुराम घाट परिसरातील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली होती. तर पेढे, परशुराममधील ग्रामस्थांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गेले वर्षभर केली. त्यासाठी शासनाला अनेकवेळा निवेदन देण्यात आले. तसेच उपोषणासह आंदोलनही करण्यात आले. मात्र याची दखल वर्षभराने घेण्यात आली.
तक्रारदार शशिकांत महादेव मांडवकर (वय 66, रा. पेढे कुंभारवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 20 जुलै ते 22 जुलै 2021 या कालावधीत चिपळूणमध्ये अतिवृष्टी सुरू होती. दरम्यान, महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू होते. पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्याकरिता मोर्यांची व्यवस्था करण्याचे काम महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत बांगर, शाखा अभियंता अमोल माडकर व संबंधित ठेकेदारांनी करणे आवश्यक होते. परंतु मोर्या बंद केल्या. त्यामुळे घाटातील रस्त्याच्या सर्व मोर्यांचे पाणी कुंभारवाडी येथे पायथ्याशी असणार्या वाडीत आले. घाटातील डोंगरभारातून पावसाचे व इतर पाण्याचा लोंढा मोठ्या प्रमाणात खाली आल्याने दरड कोसळण्याची दुर्घटना झाली.