
धरण फुटले, पळा पळा…गुहागरमध्ये उडाली धावपळ
गुहागर : पिंपर धरणाच्या कामाच्या वेळी एक झडप काही मिनिटांसाठी उघडण्यात आले. यावेळी वेगाने बाहेर पडलेले पाणी फोडलेल्या कालव्यामुळे वस्तीत शिरले. मात्र काहीही नुकसान झाले नाही.
पिंपरमधील बागायदारांनी मे महिन्यात झाडांना पाणी मिळावे म्हणून ठिकठिकाणी कालवा फोडला होता. हा कालवा नंतर बंद केला गेला नाही. त्यामुळे वेगाने वाहत आलेले पाणी कालवा फोडलेल्या बागेतून वस्तीत शिरले. अचानक वेगाने वाहत आलेल्या पाण्यामुळे त्या वस्तीत घबराट पसरली. नेमके काय घडले याची शहानिशा न करता पिंपरचे धरण फुटल्याची अफवा पसरली. मात्र जागरुक असलेल्या नैसर्गिक आपत्ती विभागाने तातडीने यंत्रणा हलवली. नेमके काय झाले हे जाणून घेतले. लघु पाटबंधारे विभागामार्फत अभियंता सुभाष बागेवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपर धरणाची खराब झालेली रबर सील आणि झडपांच्या देखभालीच्या कामाला मे अखेर सुरुवात झाली. या कामाचा भाग म्हणून 9 जुलैला दुपारी धरणाची एक झडप उघडण्यात आली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला होता. त्याच्या दाबामुळे या झडपेतून वेगाने पाण्याचा निचरा झाला. कालव्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह बदलला. अवघ्या 5 मिनिटात यांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झडप बंद केले.