शुक्रवार पासून हॉटेल विवेक बँक्वेटमध्ये अखिल भारतीय स्तरावरील आमंत्रितांची रत्नागिरी कॅरम लीग सीजन – ५ सुरु

शुक्रवार दिनांक १५ जुलै ते १७ जुलै २०२२ सलग तीन दिवस रत्नागिरी येथील हॉटेल विवेक बँक्वेटमध्ये अखिल भारतीय स्तरावरील आमंत्रितांची रत्नागिरी कॅरम लीग सीजन – ५ सुरु होत आहे.एकंदर ८ संघ यावर्षी या लीगमध्ये सहभागी झाले असून प्रत्येक संघात ६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंफिगो, इंडियन ऑइल, ओ एन जी सी व क्रिस्टलने हि लीग पुरस्कृत केली आहे. तर प्रिसाईज कॅरम कंपनीचे क्लासिक कॅरम या स्पर्धेत लावण्यात येणार आहेत. कॅरमच्या इतिहासात प्रथमच प्रत्येक खेळाडूला त्याच्या श्रेणीनुसार या लीगमध्ये खेळण्यासाठी मानधन देण्यात आहे. रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनने जवळपास ५ लाखांची रोख पारितोषिके अनुक्रमे विजेत्या संघाला १ लाख ७५ हजार, उपविजेत्या संघाला १ लाख ५० हजार, तर तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला १ लाख २५ हजार रुपये व चषक तसेच इतरही पारितोषिके ठेवली आहेत. प्रत्येक सत्रात एकावेळी १२ सामने खेळविण्यात येणार असून या सर्व सामन्यांचे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. तर सर्व सत्रांतील महत्वाचे सामने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून लाईव्ह दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे आर सी एल सीजन – ५ कॅरम रसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार असून कॅरम या खेळाला नव संजीवनी मिळणार आहे. लीगमधील सर्व खेळाडूंची निवास, भोजन, गणवेश व वातानुकूलित रेल्वे प्रवासाची जबाबदारी रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनने घेतली आहे. अखिल भारतीय कॅरम महासंघ व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने मान्यता दिलेल्या या लीगमध्ये भारतातील ३ विश्व् विजेते कॅरमपटू आर. एम. शंकरा, योगेश परदेशी व प्रशांत मोरे यांचा सहभाग असून झहिर पाशा, रियाझ अकबर अली, इर्शाद अहमद, संदीप देवरुखकर, के. श्रीनिवास, रमेश बाबू, प्रकाश गायकवाड, अशोक गौर, राजू भैसारे, अनिल मुंढे, अभिजित त्रिपनकर, महम्मद घुफ्रान, संजय मांडे सारखे आंतर राष्ट्रीय स्तरावर विशेष छाप पाडलेले कॅरमपटू खेळताना दिसणार आहेत. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या अब्दुल रहमान या उत्तर प्रदेशमधील खेळाडूकरून त्याच्या संघाला विशेष कामगिरीची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील संदीप दिवे, योगेश धोंगडे, पंकज पवार, रहीम खान, निसार अहमद, अभिषेक चव्हाण, सागर वाघमारे, अनंत गायत्री व अन्य राज्यातील वी. आकाश, एल सूर्यप्रकाश व दिल्ली बाबू सारख्या खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेतील रंगात अधिक वाढणार आहे. नवोदित जुगल किशोर दत्त, प्रफुल मोरे, यासिन शेख, सय्यद मेहदी हसन सारख्या खेळाडूंनी संघाचा समतोल साधण्यास मदत झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ८ कॅरमपटुंनाही या लीगमध्ये संधी देण्यात आली असून त्यात राहुल भस्मेचा समावेश आहे. रत्नागिरीचे स्थानिक आमदार आदरणीय उदयजी सामंत यांचे विशेष मार्गदर्शन व पाठिंबा या लीगला लाभला आहे. १५ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता स्पर्धेचे उदघाटन होईल व त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता पहिल्या सत्रातील सामने सुरु होतील, असे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण केदार यांनी सांगितले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button