जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघांची आरक्षण सोडत 13 जुलै रोजी
रत्नागिरी :जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण दि. 13 जुलै रोजी निश्चित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मतदारसंघाची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण संबंधित तहसीलदार कार्यालयात करण्यात येणार आहे. तसे पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दि. 27 जून रोजी मतदारसंघाची अंतिम रचना प्रसिद्ध करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता (ओबीसी) जागा आरक्षित ठेवता येणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
पंचायत समिती आरक्षण सोडतीवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्हाधिकार्यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्याची नियुक्ती केली जाणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षित प्रभाग निश्चित करण्यासाठी अंतिम प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचा उतरता क्रम विचारात घेतला जाईल. आरक्षण सोडतीचा अहवाल तसेच सोडतीवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेचे पूर्वी 55 गट होते. नव्या रचनेनुसार जि. प. गटांची संख्या 7 ने वाढून ती 62 वर जाऊन पोहोचली आहे. तर पंचायत समितीचे गण 110 होते. त्यामध्ये 14 वाढल्याने ही संख्या 124 वर जाऊन पोहोचली आहे. आता आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या
आहेत.
गट आणि गणांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षण सोडतीची सूचना नमुन्यात प्रसिद्ध करणे (दि. 7 जुलै 2022)
जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत (दि. 13 जुलै 2022)
पंचायत समिती निर्वाचक गणाची सोडत (दि. 13 जुलै 2022)
सोडतीनंतर निवडणूक विभाग/निर्वाचक गणनिहाय आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे (दि. 15जुलै 2022)
आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी (दि. 15 ते 21)
आरक्षण, सोडतीचा अहवाल तसेच सोडतीवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा अभिप्रायासह राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे (दि. 25 जुलै 2022)
प्राप्त हरकती व सूचनांवर निवडणूक विभाग/ निर्वाचक गणाचे आरक्षणास मान्यता देणे (दि. 29 जुलै पर्यंत)
राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या निवडणूक विभाग/निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षण प्रसिद्ध करणे (दि. 2 ऑगस्ट 2022)