मिऱ्या समुद्रकिनारी अडकून अक्षरशः गंजून भंगार झालेले बसरा स्टार जहाज तिसऱ्या पावसाळ्यातही किनाऱ्यावर सडतेय
मिऱ्या समुद्रकिनारी अडकून अक्षरशः गंजून भंगार झालेले बसरा स्टार जहाज तिसऱ्या पावसाळ्यातही किनाऱ्यावर सडत पडले आहे. जहाज काढण्यासाठी मोठा खर्च असल्याने दुबईतील एजन्सीने ते काढण्यात अनुत्सुकता दाखवली आहे. त्यानंतर हे जहाज भंगारात काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या. स्थानिक पातळीवर त्याचा ठेका दिला होता; परंतु केंद्रीय एजन्सीची परवानगी न मिळाल्याने हे काम लांबले आहे. त्यामुळे मिऱ्या किनारा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना यश आलेले नाही.
बसरा स्टार हे इंधनवाहू जहाज मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर अडकून ३ जूनला २०२२ ला तीन वर्षे झाली. निसर्ग चक्रीवादळामध्ये हे जहाज भरकटून मिऱ्या किनाऱ्यावर लागले होते. दक्षिण आफ्रिकेहून ते शारजा-दुबईला निघाले होते. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते जहाज भगवती बंदरापासून काही अंतरावर नांगरून ठेवले होते; मात्र अजस्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी लागले. या जहाजामध्ये १३ क्रूजर होते. मेरिटाईम बोर्ड, पोलिस, तटरक्षक दल आदींच्या मदतीने रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवण्यात यंत्रणेला यश आले. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या मध्यस्थीने कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मेरिटाईम बोर्डाचा युनायटेड अरब-आमिरातीच्या दूतावासाशी पत्रव्यवहार सुरू आहे. जहाज किनाऱ्यावर आदळून मोठे नुकसान झाले होते. ते काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. एजन्सीने खर्चाचा अंदाज घेतल्यानंतर जहाज काढण्याबाबत अनुत्सुकता दाखवली.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड वारंवार जहाज मालकाशी पत्रव्यवहार करत आहे; मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.