संगमेश्वर तालुक्यातील खडीओझरे येथील ६६ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीसा
संगमेश्वर : तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. तालुक्यात पडत असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून खडीओझरे येथील ६६ कुटुंबांना तालुका प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत मंगळवारी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. गतवर्षी तालुक्यात अतिवृष्टीत खडीओझरे येथे डोंगर खचून खाली आला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी भीतीच्या वातावरणात पावसाळा काढला होता. यावर्षी या ग्रामस्थांच्या जीविताला कोणताही धोका उद्भवू नये व खबरदारीचा उपाय म्हणून तालुका प्रशासनाने या गावातील तब्बल ६६ कुटुंबांना सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थलांतर करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. यामध्ये येथील ६६ कुटुंबातील सुमारे १७९ ग्रामस्थांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.