पांगरी घाटात वारंवार कोसळताहेत दरडी
देवरूख : दोन दिवस पावसाने जोर धरल्याने संगमेश्वर तालुक्यात शेतकरी सुखावला आहे. पावसाने पुन्हा एकदा रत्नागिरी मार्गावरील पांगरी येथे मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने मार्ग बंद झाला होता. तत्काळ बांधकाम विभागाने दरड बाजूला करत एकेरी वाहतूक सुरू केली.
तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने एकाच दिवशी तब्बल 210 मिमीची नोंद झाली आहे. या पावसाने तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे दोन घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये परचुरी येथील कृष्णा मेस्त्री यांच्या घरावर डोंगर उतारावरील संरक्षक बांध पडल्याने घराच्या छपराचे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
धामापूर तर्फ संगमेश्वर या गावातील सुवर्णा देवरूखकर यांच्या घरावर झाड पडून 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील असुर्डे येथील मार्गावर झाड पडल्याने वाहतूक काही काळ बंद होती. झाड बाजूला करताच वाहतूक सुरळीत झाली.
तालुक्यात पावसाने हजारी आकड्याकडे वाटचाल केली आहे. तालुक्यात एकूण पावसाची नोंद 973 मिमी इतकी झाली आहे. मंगळवारीही पावसाची संततधार सुरू होती. पावसाने जोर धरल्याने शेतकरी मात्र आनंदी झाला असून भात पिकांच्या लावणीत गुंतल्याचे चित्र दिसून येत आहे.