राज्याच्या सत्ताबदलानंतर शिवसेनेत वाढू लागले दोन गट

0
92

रत्नागिरी : राज्यात झालेल्या सत्तानाट्याचे पडसाद सध्या शिवसेनेत उमटू लागले आहेत. कोकणचा विचार करता काँग्रेस, राष्ट्रवादीत सध्या सन्नाटा असला तरी शिवसेनेत मात्र जुन्या आणि नव्या शिवसैनिकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. अनेक शिवसैनिकांची यामुळे घुसमट होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 2 आमदार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 आमदार शिंदे गटाला सामील झाल्यानंतर शिवसेनेने अनेक पदाधिकार्‍यांची पदावरून उचलबांगडी करण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे  ‘कोणता झेंडा  घेऊ हाती’ अशी अवस्था शिवसैनिकांची झाली आहे.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेत कार्यरत होते व आहेत. मात्र मागच्या काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले. 40 आमदार शिवसेनेला सोडून गेले. सोडून गेलेल्या आमदारांचे समर्थक आणि शिवसैनिक असे दोन गट आता प्रत्येक गावात आणि जिल्ह्यात पडले आहेत. काही ठिकाणी तर हे दोन गट एकमेकांसमोरही उभे ठाकले आहेत. काही ठिकाणी अंतर्गत धूसफूस सुरू आहे. राज्याच्या सत्ताबदलानंतर आता शिवसैनिकांमध्येच संघर्ष सुरू झाला आहे. सत्ताधारी आणि मुख्यमंत्री असलेल्या शिंदे गटासोबत जायचे की निष्ठा सांभाळून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहायचे, असा मोठा पेच शिवसैनिकांसमोर निर्माण झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पाचपैकी योगेश कदम, भास्कर जाधव, उदय सामंत व राजन साळवी हे चार सेनेचे आमदार आहेत. त्यापैकी सुरूवातीला योगेश कदम आणि त्यानंतर उदय सामंतही शिंदे गटात सामील झाले. सिंधुदुर्गमधून दीपक केसरकर शिंदे गटात सामील झाले. गुरूवारी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र जिल्ह्यात त्याचा जल्लोष साजरा झाला नाही. दुसरीकडे उद्धव समर्थक मात्र शांतच होते. त्यामुळे अनेकठिकाणी दुभंगलेले हे शिवसैनिक आता एकत्र येणार की एकमेकांना प्रतिस्पर्धी मानून भविष्यातही लढत राहणार, असा प्रश्न नव्याने उपस्थित होऊ लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here