
खेडमधील रसाळगड, रघुवीर घाट पर्यटकांसाठी आजपासून दोन महिने बंद
खेड : रसाळगड आणि रघुवीर घाट दि. 1 जुलैपासून दोन महिन्यांसाठी प्रशासनाने पर्यटनासाठी बंद केला आहे. येथील रस्ता धोकादायक असून दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी संबंधित सर्व यंत्रणांना दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून मोरे यांनी हा निर्णय घेतला आहे. रघुवीर घाट व रसाळगड या दोन ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी गर्दी असते. गतवर्षीच्या अतिवृष्टीत या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळणे, रस्ता खचणे अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे पर्यटनासाठी जाणे हे जीवावर बेतू शकते. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोर्यातील गावांना विविध कामे, औषधोपचार आणि अत्यावश्यक सेवांसाठी मुभा देण्यात आली आहे, असे प्रांताधिकारी मोरे यांनी आदेशात म्हटले आहे.