
जिल्ह्यातील 86 वैद्यकीय अधिकार्यांची फरपट
रत्नागिरी : आरोग्य विभागात कार्यरत 86 कंत्राटी वैद्यकीय अधिकारी एप्रिलपासून वेतनाविना आहेत. 24 तास काम करूनही वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील 86 वैद्यकीय अधिकार्यांची (बी.ए.एम.एस.) पुन्हा फरपट सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील 67 प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या महत्वपूर्ण काम बजावणार्या वैद्यकीय अधिकार्यांना शासन दोन ते तीन महिने झाले तरी पगार देत नाही. मात्र, जबाबदारी वाढवून देत आहेत. कोरोना काळात रुग्ण संख्या वाढल्यानंतर आरोग्य यंत्रणेला मनुष्यबळ कमी पडू लागले होते. त्यावेळी शासनाने या महामारीमध्ये जिल्ह्यात 86 वैद्यकीय अधिकार्यांची कंत्राटी पद्धतीवर भरती केली. 12 ते 24 तास हे अधिकारी राबत होते. तेव्हाही त्यांच्या पगाराचा प्रश्न होता आणि आताही तो तसाच आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुके दुर्गम असल्याने या ठिकाणी एम.बी.बी.एस. डॉक्टर्स यायला तयार होत नाहीत. कारण या ठिकाणी सोयीसुविधांची वानवा असते. त्यामुळे हे डॉक्टर्स मोठी शहरे या ठिकाणी किवा जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा स्वत:चे हॉस्पिटल उभे करतात. पर्यायाने बी.ए.एम.एस. पदवी प्राप्त वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करावी लागते.
शासनाच्या उदासीनतेचा फटका या वैद्यकीय अधिकार्यांना बसला आहे.