८५ टक्के शिवसैनिक उद्धवजींच्या सोबतच,रत्नागिरीतील शिवसैनिकांचा निर्धार
राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर कोकणातील एकमेव कॅबिनेट मंत्री असलेले ना. उदय सामंत यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत ८५ टक्के शिवसैनिकांशी पक्षप्रमुख, मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत शिवसेनेच्या स्टाईलने घोषणाबाजी केली. तर राष्ट्रवादीतून ना. सामंत यांच्यासमवेत शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांसह तालुक्यातील युवासेनेच्या काही पदाधिकार्यांनी मात्र मं१ी ना. उदय सामंत यांच्यासोबत राहणार असल्याचे बैठकीत ठामपणे सांगितले. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील शिवसेनेत दोन गट कार्यरत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेनेतील बंडखोर नेते मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ४० पेक्षा अधिक आमदारांना सोबत घेत शिवसेना अंतर्गत नवा गट तयार करुन सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे. गुवाहाटी येथे मुक्कामाला असलेल्या या आमदारांविरोधात महाराष्ट्रात राजकीय धुमशान सुरू असतानाच कोकणातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनीही शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसारच सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, विधानसभा क्षेत्र संघटक, ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद शेरे यांच्या उपस्थितीत मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्व पदाधिकार्यांनी आपली भूमिका मांडत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
सुमारे साडेसात वर्षापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत येताना ना. उदय सामंत यांनी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आपल्यासोबत शिवसेनेत आणले होते. त्यांनी मात्र ना. सामंत यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेणार असल्याचे ठामपणे सांगितले. जिथे आमचे साहेब, तेथे आम्ही अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली तर युवा सेनेनेही ना. सामंत यांच्यासोबतच राहणार असल्याचे बैठकीत स्पष्ट केले.
रत्नागिरीतील शिवसैनिक उध्दव ठाकरेंच्या पाठीशी – राजेंद्र महाडीक
शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक म्हणाले की, रत्नागिरीचे आमदार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीला गेले. त्यामुळे मतदार संघात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या विषयाच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.
शिवसेनेचे गतवैभव परत मिळवू – विलास चाळके
बैठकीमध्ये काही अपवादात्मक पदाधिकारी सोडले तर मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. शिवसेनेचे वैभव आम्ही परत मिळवू असे रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सांगितले. www.konkantoday.com