अपंगत्व आलेल्या प्रगतीला आरएचपी फाउंडेशनचा मदतीचा हात

पुढील शिक्षणासाठी सहकार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन

रत्नागिरी
घरी सर्व कामे करणाऱ्या तरुणीला मेंदूवरील शस्त्रक्रियेमुळे कमरेखाली अपंगत्व आले. ती फिरायची बंद झाली, ती अंथरुणाला खिळल्यामुळे तिच्यासह आई-वडिल व कुटुंबीय पार कोलमडून गेले. मुंबईत फिजिओथेरपीनंतर थोडी सुधारणा झाली. परंतु आता रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने तिला व्हिलचेअर देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले आहे. व्हीलचेअरवरून ती घरात फिरू लागली आहे. तिच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहू लागला. हळुहळू बाहेरही फिरायला लागेल. तिला पुढे अजून शिक्षण घ्यायचे आहे. आता तिच्या घराजवळील पाखाडी किंवा सपाटीकरण केल्यास तिला घराबाहेर पडता येणार आहे, त्याकरिता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही फाउंडेशनने केली आहे.

प्रगती विजय गुरव (रा. देवधे, लांजा) असे या तरुणीचे नाव आहे. जन्मत:च तिच्या डोक्यामागील भाग मऊ होता. तिला त्याचा काहीच त्रास नव्हता, ती घरातील सर्व कामे करत होती. जेवण बनवणे, भांडी, घासणे, विहिरीवरून पाणी आणणे, लाकडे आणणे, शेतीच्या कामात मदत करणे आदी सर्व कामे ती कोणताही त्रास न होता करत असे.

नातेवाइक व मित्रपरिवार हे सतत प्रगतीच्या आई- वडिलांना बोलत की डोक्याला गाठ आहे. ती चांगली दिसत नाही, मुलीची जात आहे, उद्या तीचं लग्न होईल! हे बरं नाही. तुम्ही आई- वडील आहात ना? तुमच्या मुलीची तुम्हाला काळजी नाही का, असे बोलणे त्यांना नेहमी ऐकावे लागत होते. म्हणून त्यांनी विचार केला. यावर शस्त्रक्रिया करायची त्यासाठी ते मुंबईच्या नामांकित रुग्णालयात गेले. तेथे उपचार सुरू झाले. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिच्या मणक्यात इंजेक्शन देऊन मणक्यातील पाणी काढण्यात आले. नंतर मेंदुवरील गाठीचे ऑपरेशन करायचे ठरले. त्यानंतर ती चांगली होईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते.

प्रगतीने २०१७ साली इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती व नंतर ती ऑपरेशनसाठी मुंबईला गेली. ऑपरेशन केल्यानंतर ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिला कळलं की तिच्या शरीराला संवेदना आहेत, पण ती उठू शकत नाही, बसू शकत नाही, तिला चालता येत नाही, एखादी हवी असणारी वस्तू ती स्वतःहून उचलू शकत नाही. हे लक्षात आल्यावर ती पूर्ण खचून गेली, आता तिला सेरेब्रल पाल्सीचे व्यंगत्व नशिबी आल्याचे सांगण्यात आले. तिच्यासोबत तिचे आई- वडील देखील कोलमडले.

सर्वसामान्य माणसांप्रमाणे चालणारी, फिरणारी, बोलणारी आमची मुलगी अचानक अशी अंथरुणाला खिळली. आता पुढे काय? हा प्रश्न पडला तिच्या आई बाबांना पडला. तिच्यामागची तिची भावंडही इथेच गावात त्यांच्या आजीकडे सोडून गेले होते. त्यांच्यासाठी मागे यावे लागणार होते. प्रगतीच्या पुढील उपचारांसाठी व्यायाम, फिजिओथेरपी करायची होती.

शेती व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारी गुरव कुटुंब. परिस्थितीत नसतानाही मुलीच्या उपचारांसाठी त्यांनी विरार येथे भाड्याने खोली घेतली. तिचे बाबा गावाला तिच्या लहान भावंडांना सांभाळायला परत आले. प्रगतीसोबत तिची आई फक्त थांबली. तिला दररोज थेरपीसाठी परेलला आणावे लागत होते. प्रगतीची आई प्रगतीला स्वतः एकटी त्या रेल्वेने विरार ते परेल ने- आण करत होती. त्यांच्या या प्रयत्नाना थोडेफार यश आले. ती दुसऱ्याच्या मदतीने उठून उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली. धरून धरून चालू लागली होती. तिची सर्व काम तिची आई करायची.

अशा प्रकारे जर अपंगत्व आलेल्या व्यक्ती असतील तर रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन, अध्यक्ष सादिक नाकाडे (94054 61545) समीर नाकाडे (94224 31881), प्रिया बेर्डे (97674 56906) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

प्रगतीला आरएचपीतर्फे व्हीलचेअर
प्रगतीची ही सर्व कथा कळल्यानंतर रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने (आरएचपी) प्रगतीला व्हीलचेअर द्यायचे ठरवले. विशेष म्हणजे याकरिता संस्थेचा सदस्य दिव्यांग प्रितम कदम याची मदत झाली. त्याच्याकडे दोन व्हीलचेअर होत्या. स्वतःकडील एक व्हीलचेअर आपल्यासारख्या गरजू व्यक्तीला द्यायचे असे त्याने ठरवले होते. याकरिता त्याने ही व्हीलचेअर आरएचपी फाऊंडेशनकडे दिली. याकरिता संस्थेचे सदस्य समीर नाकाडे यांनी तिला व्हीलचेअर वर कसं बसायचं, स्वतः व्हीलचेअर कशी ढकलायची, ब्रेक कसा लावायचा, हे शिकवले. त्याचप्रमाणे प्रगतीच्या घरच्यांना व्हीलचेअर पायऱ्यांवरून उतवायची, चढवायची, घराबाहेर कशी घ्यायची, याचे प्रशिक्षण दिले. दिलेल्या व्हीलचेअरमुळे ती सध्या घरातल्या घरात फिरू लागली आहे. तिच्या चेहर्‍यावर आनंद व आत्मविश्वास वाढत आहे. हळुहळू बाहेरही फिरायला लागेल. तिला पुढे अजून शिक्षण घ्यायचे आहे. तिच्या पुढील प्रवासासाठी संस्थेकडून शुभेच्छा देण्यात आल्या. तिच्या घरात जाण्यासाठी चिरेबंदी पाखाडी किंवा सपाटीकरणाची गरज आहे. त्यासाठी मंजूर झालेली पाखाडी विरोधामुळे बांधता आलेली नाही. त्यामुळे ही पाखाडी लवकरात लवकर होण्यासाठी ग्रामपंचायत आणि सरपंचांनी लक्ष घालण्याची मागणी आरएचपी फाउंडेशनने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button