
लोटे-परशुराम उद्योजक संघटनेतर्फे पुरस्कारांचे वितरण
खेड : ओळखीने काम मिळविण्यापेक्षा कामाने ओळख निर्माण करा. कर्तृत्वाने, तुमच्या कामाने, तुमच्या सिद्धतेने तुमची ओळख झाली पाहिजे. असोसिएशन उद्योजकांचे प्रश्न सोडवताना समाजातील विविध घटकांना सन्मानित करत आहात ही गोष्ट कौतुकास्पद आहे, असे मत बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड यांनी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे नुकत्याच आयोजित गौरव सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
यावेळी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. मंगेश तांबे, उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटर्वधन, जनरल सेक्रेटरी ॲड. राज आंब्रे, सह सेक्रेटरी मिंलिंद बारटक्के उपस्थित होते. नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. मंगेश तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जनरल सेक्रेटरी ॲड. राज आंब्रे प्रस्तावना केली. अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शुभेच्छा दिल्या. लोटे परशुराम उद्योजक संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी औद्योगिक वसाहतीतील सभासद कंपन्यांतील कर्मचा-यांच्या पाल्यांचा तसेच लोटे पंचक्रोशीतील शाळांतील 10 वी व 12 वीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षीचा कोकण गौरव पुरस्कार पत्रकारितेच्या माध्यमातून सामजिक काम करणाऱ्या चिपळूणचे सतीश कदम व सामाजिक क्षेत्रात काम करणा-या रत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठान या संस्थेला प्रदान करण्यात आला.
यावर्षीचा उत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कारासाठी लहान उद्योगांमधून पारको फार्मासिटीकल ऍन्ड केमिकल्सचे श्री. मोहन नाईक, उत्कृष्ट सुरक्षा अधिकारी पुरस्कारासाठी यु.एस.व्ही प्रा. लि.चे श्री. शैलेश वडके यांना गौरवण्यात आले. तसेच गुणवंत कर्मयोगी पुरस्कारासाठी मोठ्या उद्योगामधून फायरटेक इक्युपमेंट सिस्टीम प्रा. लि.चे श्री. प्रविण भालेकर व यु.एस.व्ही प्रा. लि. चे श्री.हंबिरराव थोरात व लहान उद्योगामधून रेणुका टायर्स ऍन्ड ट्रेड्स चे श्री. शरद उतेकर, व योजना इंटरमीडिएट प्रा. लि.चे श्री. अविनाश चांदीवडे यांना गौरवण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत वडके, कुंदन मोरे, शिरीष चौधरी, विश्वास जोशी, राजेंद्र पवार, किसन चव्हाण, आनंद पाटणकर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा पोतदार यांनी केले. या कार्यक्रमाला लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक, व्यवस्थापक, कर्मचारी व विद्यार्थांनी उपस्थित होते.