
राजापूर तालुक्यात फळबाग लागवडीसाठी नियोजन
राजापूर : तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आणि अन्य योजनेंतर्गत वृक्षलागवडीसह फळबाग लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत तालुक्याला 101 हेक्टर लागवड तर, वृक्षलागवडीअंतर्गत 20 हजार झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास पंडित यांनी दिली. या महत्वाकांक्षी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावोगावी ग्रामपंचातीच्या माध्यमातून बैठका घेऊन लोकांशी संवाद साधला जात आहे. त्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून कृषी अधिकारी, पाच विस्तार अधिकारी, मग्रारोहयोजनेचे संबंधित कार्यक्रम अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे श्री. पंडीत यांनी स्पष्ट केले. त्यांच्यामार्फत गावोगावी बैठका घेऊन लोकांशी संवाद साधला जात आहे. या योजनेतून संबधित लाभार्थ्यांना विहीर बांधकामासाठी सुमारे 2 लाख 50 हजार रूपयांचे अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्याकडे किमान 40 गुंठे जागेची उपलब्धतता असणे गरजेचे असून दीड लाख उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, सहहिस्सेदारांची संमतीपत्र आदी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. त्याचा लाभ इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहनही पंडित यांनी केले आहे.