नारगोली- पालवणी मार्गावरील मोर्‍यांची, पुलांची कामे वाहतुकीस अडचणीची

0
27

मंडणगड : सार्वजनिक बांधकाम विभागाने मंडणगड पालवणी या राज्यमार्गावर नारगोली ते पालवणी या गावांच्या हद्दीत बांधकाम हंगाम संपताना सुरु केलेल्या मोर्‍यांची व पुलांची कामे वाहतुकीस अडचणीची ठरत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात मंडणगड पोलीस चेक नाका व पालवणी आवाशी फाटा या ठिकाणी दोन सूचना फलक लावले असून, या रस्त्याचे पुलाचे काम सुरु असल्याने पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे येथील वाहनचालक संतप्त झाले आहेत.
सप्टेंबर 2021 बजेटमध्ये मंजूर असलेल्या या रस्त्यावरील पुलाचे काम पावसाच्या तोंडावर हाती घेण्याची कृती अनाकलीय असून, यामुळे पावसात या मार्गावरील चारचाकी वाहनांची वाहतूक बंद राहण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामास अद्यापही सुरुवातही करण्यात आलेली नाही. त्यामुळे बहुदा पुढच्याच हंगामात या रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मार्गावर प्रामुख्याने नारगोली घाटातील लहान मोर्‍या व पालवणी जांभुळनगर या दरम्यान असलेल्या मोठ्या पुलाचे काम तर मे महिन्याच्या उत्तरार्धात हाती घेण्यात आले आहे. पालवणी शाळेजवळील पुलाच्या स्लॅबवर पाणी टाकण्याचे व पुलाच्या संरक्षक भिंतीत भराव टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. याशिवाय लहान मोर्‍या बसवण्याचे काम जून महिन्यातही सुरु असून, यामुळे रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आले
आहे.
त्यामुळे या मार्गावर प्रवास करणार्‍या वाहनांना पर्यायी रस्ता वापरण्याचा सल्ला बांधकाम विभागाने दिलेला असल्याने पावसाळ्यात काय करणार, असा मुख्य प्रश्न निर्माण होतो. या पुलाला जोड देणारा रस्ता डिसेंबर महिन्यातच पूर्ण झाला आहे. मात्र, पुलाचे काम रखडल्याने दापोली येथे जाण्यासाठी पर्यायी असलेला रस्ता पावसात बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाच्या तोंडावर रस्त्यावरील कामे सुरु करुन पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याने कामात दिरंगाई करणारा ठेकदार व अभियंता या दोघांवरही कारवाई करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here