उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है; देवरूखमध्ये शिवसैनिकांची पाठिंब्याची घोषणाबाजी

0
237

देवरूख : उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है… शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है…अशा घोषणा देत देवरूख येथील शिवाजी महाराज चौकात संगमेश्वर तालुक्यातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शवला आहे. यावेळी संगमेश्वर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अजित गवाणकर, माजी सभापती नंदादीप बोरूकर, शहरप्रमुख दादा शिंदे, देवरूख शहरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने सरकार धोक्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना संगमेश्‍वर तालुक्यातील शिवसैनिक आता शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी एकवटले आहेत. शिवसेनेतून कोणीही बाहेर पडले तरी आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. शिवसेना पक्षाच्या वरीष्ठ स्तरावरून जे आदेश येतील त्याचे पालन आम्ही करणार. आम्ही कट्टर शिवसैनिक असून शेवटच्या श्‍वासापर्यंत शिवसैनिकच राहू, अशी भूमिका संगमेश्‍वर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अजित उर्फ छोट्या गवाणकर यांनी मांडली आहे. शिवसेनेने आजपर्यंत अनेक संकटे झेलली आहेत. मात्र कट्टर शिवसैनिक शेवटपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहिला आहे. मागील काही वर्षात तालुक्यातील शिवसेनेवरही अनेक संकटे आली. अनेकांनी पक्षांतर्गत बंड केले. त्यावेळी आमच्यासारखे शिवसैनिक सेनेसोबत खंबीर उभे राहिले. सध्या घडत असलेल्या परिस्थितीतही आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठाम आहोत, असे गवाणकर म्हणाले. पक्षप्रमुख ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका तालुक्यातील शिवसैनिकांची आहे, असे अजित गवाणकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here