एसटी वेळेवर येत नाही म्हणून कर्ली रावणंगवाडीतील विद्यार्थ्यांची 5 किमीची पायपीट
देवरूख : देवरूख-कर्ली या मार्गावर सुटणार्या फेर्या वेळेत नसल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेकवेळा कर्ली रावणंगवाडी येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास उशीर होतो. एसटी नसली की 5 किलोमीटरचे अंतर चालत जावे लागते. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी देवरूख आगारात जाऊन आगार प्रमुखांसमोर आपली व्यथा मांडली.
देवरूख येथून माळवाशी, कर्ली या गावांमध्ये जाण्या-येण्यासाठी एसटीच्या फेर्या सोडल्या जातात. मात्र सकाळ व सायंकाळच्या सत्रातील फेर्या वेळेत सुटत नसल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे. शाळेत पोहोचायला उशीर होतो. त्यामुळे पहिले तास मिळत नाहीत. परिणामी शिक्षकांकडून ओरडा खावा लागतो. रावणंगवाडी येथील विद्यार्थ्यांना वाशी फाट्यापर्यंत 5 किलोमीटर अंतर चालत यावे लागते. येथील रस्ता निर्जन असल्याने हिंस्र प्राण्यांची भीती या मार्गावर आहे. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने पालकही शाळेत चालत पाठवण्यास तयार होत नाहीत. एसटी प्रशासनाकडून वारंवार एसटी बस वेळेत सोडली जात नाही. काही वेळा फेरी रद्द केली जाते. या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी देवरूख आगारावर धडक दिली.
दीपराज रावणंग, संतोष रावणंग, महेंद्र रावणंग, सुजाता रावणंग, गौरी जोशी, दीपिका रावणंग, संदीप जोगळे, विजय आंबेकर, गणपत शितप, अनंत जोशी, नारायण घाणेकर यांच्यासह पालक व विद्यार्थ्यांनी आपली व्यथा एसटीच्या अधिकार्यांकडे मांडली. एसटी बस वेळेत सोडाव्यात, अशी मागणी केली.