अर्जुना पुलाखालील भराव ठरतोय धोकादायक
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर पुलाचे बांधकाम करताना नदीपात्राच्या मध्यभागामध्ये ठेकेदार कंपनीकडून टाकण्यात आलेला भराव काढण्यात आला आहे. मात्र, कोंढेतडच्या बाजूचा भराव आहे त्याच ठिकाणी आहे. हा मातीचा भराव पावसाळ्यामध्ये पाण्यासोबत वाहून जाऊन बंदरधक्का परिसरामध्ये साचला आहे. त्यातून पुराचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांच्यासह शहरातील व्यापार्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. त्यावर दीनानाथ कोळवणकर, सुधीर खडपे, प्रकाश कातकर, दिलीप रहाटे, गिरीष विचारे, विनय गादीकर, संदेश आंबेकर यांच्यासह अन्य व्यापार्यांच्या स्वाक्षर्या आहेत. अर्जुना नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाच्यावेळी संबंधित ठेकेदार कंपनीने नदीपात्राच्या मध्यभागी आणि कोंढतडच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकलेला आहे. पावसाळ्यामध्ये हा भराव तसाच राहिल्याने त्याचा फटका शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्त्याला गतवर्षी बसला होता. मध्यभागी टाकण्यात आलेला मातीचा भराव काढला आहे. मात्र, कोंढेतडच्या बाजूचा भराव आहे तसाच आहे.