
माझ्यावर करण्यात येणारे आरोप हे पूर्वग्रहदुषित-,केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
ट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या सरकारच्या निर्णयावर सध्या टीका होत आहे. गडकरींनी मुलाच्या कंपनीसाठी हा निर्णय घेतल्याचा आरोपही करण्यात येतोय. आता या आरोपांवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिलीय.माझ्यावर करण्यात येणारे आरोप हे पूर्वग्रहदुषित आहेत. सगळं पेड कॅम्पेन असून राजकीयदृष्ट्या टार्गेट करण्यासाठीचं हे षडयंत्र असल्याचं गडकरी म्हणाले. एका कार्यक्रमात ते बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले की, E20 पेट्रोल रोलआऊट कार्यक्रमाबाबत माझ्याविरोधात चालवण्यात आलेली पेड मोहिम आता खोटी सिद्ध झालीय. जुन्या वाहनांना स्क्रॅप करून नवी कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जीएसटीमध्ये दिलासा देण्यावर विचार सुरू आहे. अशी पावले उचलल्यास ग्राहक आणि ऑटो उद्योगाला चांगले दिवस येतील असंही गडकरींनी म्हटलं.पेट्रोलमध्ये इथेनॉल २० टक्के मिसळण्यावरून सोशल मीडियावर सध्या उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त केली जातेय. यावर बोलताना गडकरी म्हणाले की, पेट्रोलियम क्षेत्र यावर काम करत आहे. प्रत्येक ठिकाणी लॉबी असते आणि हितसंबंध असतात… पेट्रोल लॉबी खूपच समृद्ध आहे.
तुमचा उद्योग ज्या पद्धतीने काम करतो त्यानुसारच राजकारण होत असतं. सोशल मीडियावर मोहिम पैसे घेऊन चालवली जात होती. मला राजकीयदृष्ट्या टार्गेट कऱण्यासाठी हे केलं होतं. यात काहीच तथ्य नाहीय. सगळं काही स्पष्ट आहे. इथेनॉल मिश्रण करणं हा आयातीला पर्याय आहे. प्रदुषण मुक्त असून स्वदेशीसुद्धा आहे. यावरचा खर्चही मर्यादीत असल्याचं गडकरी म्हणाले.
प्रदुषणाच्या दृष्टीकोनातून ई२०च्या परिणामावर बोलताना गडकरींनी म्हटलं की, प्रदुषण कमी करण्याबाबत जगाचं एकमत आहे. एका रिपोर्टमध्ये असं समोर आलंय की प्रदुषण असंच सुरू राहिलं तर दिल्लीतील नागरिकांचं आयुष्य १० वर्षांनी कमी होईल.
E20 पेट्रोल म्हणजे पेट्रोल ८० टक्के आणि इथेनॉल २० टक्के मिसळून तयार केलं जाणारं इंधन, सरकारकडून इथेनॉल मिश्रणाचा वापर हा कार्बन उत्सर्जन आणि जीवाश्म इंधनाची आयात कमी करण्यासाठी निर्णय घेतला गेलाय. मात्र वाहनधारकांचा दावा आहे की यामुळे इंजिन खराब होतंय, वाहनांमध्ये बिघाड होत आहे.




