जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकर्यांच्या तोंडाला पुसली पाने; अवघी 5.15 टक्के दरवाढ
रत्नागिरी : या वर्षीच्या खरीप हंगामात भाताच्या दरामध्ये अवघी 5.15 टक्के वाढ करून भात उत्पादक शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी कैफियत आता शेतकर्यांनी कृषी विभागाकडे मांडली आहे. मजुरीचे वाढलेले दर तसेच गेल्या काही महिन्यांत भात बियाणे, खते, अवजारे यांच्या दरात 30-40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असताना येणार्या खरीप हंगामातील भातपिकाचे दर केंद्र सरकारने अवघ्या 5.15 टक्क्यांनी वाढवल्याने भात उत्पादक शेतकरी नाराज आहेत. गतवर्षी भाताचा दर प्रति क्विंटलला 1 हजार 940 रुपये इतका होता. या दरात 5.15 टक्के वाढ करून हा दर 2 हजार 40 रुपये इतका करण्यात आला आहे. येथील शेतकर्यांना भाताच्या उत्पादनासाठी प्रति क्विंटल 1 हजार 700 ते 1 हजार 800 इतका खर्च येतो. सरकारकडून सध्या प्रति क्विंटलचा दर 2 हजार 40 रुपये इतका देण्यात येत आहे. त्यामुळे सध्याच्या महागाइच्या तुलनेत प्रत्येक क्विंटलमागे शेतकर्याला अल्प नफा होणार आहे.