
रत्नागिरी विमानतळावरून खा. राऊत हे जनतेची दिशाभूल करताहेत : माजी खासदार नीलेश राणे
रत्नागिरीचे विमानतळ हे केंद्रीय मंत्री नारायण राणेच मार्गी लावतील. मागील 8 वर्ष विद्यमान खासदार विनायक राऊत विमानतळाचा प्रश्नावरून लोकांची दिशाभूल करत होते. हे विमानतळ तटरक्षक दलाकडे असल्यामुळे संरक्षण खात्याकडून त्याविषयी प्रश्न मार्गी लावावे लागतील. खासदार राऊत फक्त गोलगोल फिरवत होते, प्रत्यक्षात विमानतळासाठी त्यांनी काहीच केलेले नाही, असा आरोप नीलेश राणे यांनी केला. रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रत्नागिरी पालिकेसाठी भाजप नियोजनबध्द काम करत आहे. विरोधकाची भूमिका आम्ही चांगल्याप्रकारे वठवत आहोत. पालिकेत परिवर्तन निश्चितच होईल, असा विश्वास नीलेश राणे यांनी व्यक्त केला.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून दोन वर्षांचा कालवधी लोटल्यानंतर चौकशी समितीचा अहवाल पुढे आला आहे. समितीने ठेकेदारासह अधिकार्यांवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे. मात्र, शिवसेनेचे चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण हेच धरणाचे ठेकेदार असल्याने त्यांना वाचविण्यासाठी सरकार कारवाई टाळत आहे. त्यामुळे याबाबत लोकायुक्तांकडे अर्ज सादर केला असून त्यामध्येही न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाऊ, असा इशारा भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी दिला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग यांच्यासंदर्भात सीबीआयकडे योग्य ती कागदपत्रे सादर केली आहेत. सध्या जेलमध्ये असलेला आरोपी प्रदीप गर्ग याला विशेष सवलती दिल्या जात आहेत. आम्हाला मिळालेली माहिती सीबीआयकडे सादर केली आहे. तसेच पोलिस वेल्फेअर फंडातील खर्चांमध्ये गोलमाल असल्याचा आमचा संशय आहे. त्या संदर्भातील आवश्यक कागदपत्रेही सादर केली आहेत, असे राणे यांनी सांगितले.