रत्नागिरीतील पोलिस भरतीत मदत करतो असे सांगून लाखोंचा गंडा घालणाऱ्याला अटक
रत्नागिरी:- स्वत:ची अकॅडमी काढून रत्नागिरी पोलीस दलात लेखी परीक्षेत मदत करून पोलिस दलात भरती करतो, असे सांगून पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या विजय लक्ष्मण व्हरांबळे (रा.व्हरांबळे अकॅडमी, गोळीबार मैदान, कोल्हापूर) याला शाहूपूरी पोलीसांनी अटक केली आहे. काही दिवसांपुर्वी डमी उमेदवार लेखी परिक्षेला बसवून पोलीस दलात चालक म्हणून भरती झालेल्या तरुणाला पोलीसांनी अटक केल्यानंतर पुन्हा एकदा रत्नागिरीतील पोलीस दलात भरती करण्याच्या अमिषाने पैसे उकळणाऱ्या तरुणाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
महाराष्ट्र पोलिस दलांसह रेल्वेमध्ये शिपाई, सुरक्षारक्षक तसेच टी.सी. क्लार्क म्हणून नोकरीला लावण्याच्या आमिषाने कोल्हापूर पेठ येथील तरुणासह त्याच्या साथीदाराकडून ७ लाख ७५ हजार रुपये उकळल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात विजय लक्ष्मण व्हरांबळे याच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल झाला.जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२१ या काळात कसबा बावडा येथील गोळीबार मैदानाजवळील व्हरांबळे अकॅडमीमध्ये हा प्रकार घडला. व्हरांबळे याने अनेक सुशिक्षित, बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याचा संशय शाहूपुरीचे प्रभारी पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी व्यक्त केला.संशयित व्हरांबळे याने सुरू केलेल्या अकॅडमीत अविनाश अशोक माने (वय २७, रा. सोमवार पेठ) याच्यासह त्याच्या सहकारी मित्रांनी प्रवेश घेतला होता. ते सर्व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासह मैदानावर सराव करीत होते. व्हरांबळे याने रत्नागिरी येथे पोलिस भरती सुरू आहे. लेखी परीक्षेत मदत करून पोलिस दलात भरती करतो, असे सांगून अविनाश माने याच्याकडून ३ लाख ५० हजार व अन्य साथीदारांकडून उर्वरित रक्कम अशी एकूण ७ लाख ७५ हजार रुपये उकळून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पैसे उकळूनही नोकरी लावण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या व्हरांबळेकडे तरुणांनी रक्कम परत मिळावी, यासाठी तगादा लावला. मात्र त्याने दमदाटी सुरू केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.