
“घरडा” केमिकल्स कारखान्यातील स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांची घोषणा
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील “घरडा केमिकल्स” या केमिकल उत्पादक कंपनीत काल झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले.
या दुर्घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्यात येईल अशी घोषणा उद्योग राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केली आहे. त्याचबरोबर दुर्घटनेतील पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 55 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे घरडा केमिकल्स तर्फे सांगण्यात आले असून जखमी कामगाराच्या उपचारासाठी वीस लाख रुपये देण्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.
या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी तातडीने औद्योगिक सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी गरज आहे, अशा ठिकाणी औद्योगिक सुरक्षा उपाययोजना तात्काळ राबविण्यात येतील, असेही राज्यमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांनी सांगितले आहे.
www.konkantoday.com