पोलिसांनी चक्क उंदराच्या ताब्यातून 5 लाख रुपयांचे सोने जप्त केले,मुंबईतील प्रकार
मुंबईमध्ये एक विचित्र प्रकरण तडीस नेण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चक्क उंदराच्या ताब्यातून 5 लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. दिंडोशी भागामध्ये हा प्रकार घडला असून याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
दिंशोडी येथे राहणाऱ्या सुंदरी प्लानिबेल यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी 10 लाखांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्या बँकेमध्ये सोन्याचे दागिने गहाण ठेवणार होत्या. तीन दिवसांपूर्वी त्या बँकेत जाताना रामनगर येथे त्यांनी चुकून वडापावसोबत दागिन्यांची पिशवीही भिक्षेकरी महिलेकडे दिली.
बँकेत गेल्यावर दागिने सोबत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांची बोबडी वळली. त्यांनी पुन्हा रामनगर येथे धाव घेतली. मात्र भिक्षेकरी महिला तिथे उपस्थित नसल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी दिडोशी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. महिलेच्या तक्रारीनंतर सहायक पोलीस निरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे, सूरज राऊत, माईगंडे, कांबळे, जाधव, पोटे यांच्या पथकाने सोन्याचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या फुटेजवरून पोलिसांनी भिक्षेकरी महिलेचा आणि सोन्याचा शोध घेतला. ही महिला वडापावची पिशवी कचराकुंडीत फेकत असल्याचे दिसले आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही पिशवी एक उंदीर उचलून घेऊन जात असल्याचे दिसले. त्यानंतर दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कचरा कुंडीजवळील गटारातून सोन्याचे दागिने असलेली पिशवी बाहेर काढली आणि पीडित महिलेला सोपवली.
मुंबईमध्ये एक विचित्र प्रकरण तडीस नेण्यात पोलिसांना यश आले आहे.
www.konkantoday.com