रत्नागिरी नगर परिषदेची आरक्षण सोडत जाहीर; प्रभाग क्र. 9 अ ची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव, मिलिंद किर यांचा आक्षेप
रत्नागिरी : नगर परिषदेची आरक्षण सोडत जाहीर झाली असून प्रभाग क्र. 9 अ ची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाली आहे. त्याचबरोबर या प्रभागात अनुसूचित जाती प्रवर्गातील स्त्री आणि पुरूषांनाही उमेदवार होता येणार आहे, अशी सोडत निघाली.
प्रभाग क्र. 9 अ अनुसुचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी काही आक्षेप उपस्थित केले. यासंदर्भात 15 ते 21 जूनपर्यंत जिल्हाधिकार्यांकडे आक्षेप नोंदवावेत, असे मुख्याधिकार्यांनी सूचित केले. रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभागनिहाय आरक्षण सोडत सोमवारी काढण्यात आली. यासाठी नगर परिषदेच्या झालेल्या सभेवेळी पिठासन अधिकारी म्हणून प्रांत विकास सूर्यवंशी यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी तुषार बाबर यांचे सहकार्य लाभले.
यामुळे राजकीय पक्षांना या प्रवर्गातील उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. या आरक्षण सोडतीवरून शिवसेनेचे विजय खेडेकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. उर्वरित प्रभागातील अ जागा सर्वसाधारण स्त्रियांसाठी आणि ब जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभागाची एकूण संख्या 16 इतकी असून, 32 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. यामध्ये 16 महिला सदस्य संख्या तर 15 अनारक्षित किंवा सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना निवडून द्यायचे आहे.