
भांबेड येथे मारहाण; सावत्र भाऊ, आई विरोधात गुन्हा दाखल
लांजा : सावत्र भावास वाटेत थांबवून तू मला शिवी का दिलीस अशी विचारणा करत दोघे भाऊ आणि सावत्र आई यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना लांजा तालुक्यातील भांबेड येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात सावत्र भाऊ आणि आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद ऋषिकेश राजेंद्र मिरजकर (वय 30, रा. भांबेड) यांनी पोलिस ठाण्यात दिली. ऋषिकेश राजेंद्र मिरजकर हा शुक्रवार दि. 10 जून रोजी त्याचा मित्र सुभाष रसाळ यांच्यासह कामानिमित्ताने आपली मोटरसायकल (क्रमांक एम एच 08-ए- 9090) घेऊन भांबेड येथून लांजाकडे चालला होता. काही अंतरावर गेल्यानंतर ऋषिकेश याला आपली महत्त्वाची कागदपत्रे घरी राहिल्याचे लक्षात आले. त्यानंतर गाडी पुन्हा वळवून तो आपल्या घरी जाण्यास निघाला. भांबेड लक्ष्मीनगर येथील राजू गांधी यांच्या घरासमोर आला असता दुपारी 12.30 वाजण्याच्या दरम्याने ऋषिकेश याचा सावत्रभाऊ यश मिरजकर आणि जय मिरजकर हेदेखील मोटरसायकलने येऊन ऋषिकेश याच्या मोटारसायकल समोर गाडी उभी केली. या वेळी त्याची सावत्र आई स्वाती मिरजकर ही देखील त्या ठिकाणी आली. यावेळी यश मिरजकर व जय मिरजकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या लाकडी दांड्याचा धाक दाखवून ऋषिकेश यास तू मला शिविगाळ का केलीस असे विचारले. मात्र, ऋषिकेश याने मी तुम्हाला शिवीगाळ केलेली नाही, असे सांगितले.
यानंतर ऋषिकेश यास त्याची सावत्र आई स्वाती मिरजकर हिने त्याच्या कानाखाली मारली. यश मिरजकर व जय मिरजकर यांनी त्यांच्या कडील लाकडी दांडक्याने पायावर, हातावर मारून दुखापत केली. याप्रकरणी ऋषिकेश मिरजकर याने लांजा पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी स्वाती मिरजकर तसेच यश मिरजकर आणि जय मिरजकर अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे