शिक्षण हक्क कायद्यांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 181 प्रवेश जागा रिक्त

रत्नागिरी : राज्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशाच्या 73 हजार 652 जागांवर पालकांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. तर 28 हजार 254 जागा अद्यापही रिक्‍त आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 181 जागांचा समावेश आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीच्या प्रवेशासाठी दुसर्‍यांदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील 9,086 शाळांमध्ये आरटीईच्या 1,01,906 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 2 लाख 82 हजार 783 अर्ज प्राप्त झाले होते. लॉटरीत 1,12,560 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. सोमवार दि.5 रोजी सायंकाळपर्यंत 73 हजार 652 विद्याथ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 94 शाळांमध्ये 914 जागा आरटीई अंतर्गत राखून ठेवण्यात आल्या होत्या. यासाठी एकूण 1038 जणांनी ऑनलाईन अर्ज केला. यापैकी 671 जणांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. यातील 490 जणांनी आपला प्रवेश निश्‍चित केला असून, अद्यापही 181 जागा रिक्‍त आहेत. लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी तीन वेळा शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली होती. त्यानंतर प्रतीक्षा यादीची निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, पालकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आरटीई प्रवेशांना विलंब झाला आहे. जुलैअखेर आरटीई प्रवेशप्रक्रिया लांबण्याची चिन्हे
आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button