सिंधुदुर्गात आढळला नाकाड्या चापडा (Hump Nosed Pit Viper) दुर्मिळ सर्प

0
177

कोकणात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते. सिंधुदुर्गाला कोकणातील जैवविविधता भांडार म्हणून ओळखले जाते. याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात सापाची दुर्मिळ प्रजाती आढळली आहे. याच तिलारीच्या खोऱ्यात विविध प्राणी, पक्षी, वनस्पती आहेत. नाकाड्या चापडा या सापांच्या दुर्मीळ प्रजातीची तिलारी मधील केर-भेकुर्ली भागात सिंधुदुर्गातील पहिलीच नोंद झाली आहे.
वन्यजीव अभ्यासक संजय सावंत, तुषार देसाई व उदय सातार्डेकर हे जंगलात वन्य अभ्यासाकरिता गेले होते. त्यावेळी त्यांना ही दुर्मीळ प्रजाती आढळून आली.
Hump Nosed Pit Viper अर्थात नाकाड्या चापडा विषारी सापांमधील जगभरात प्रसिद्ध असलेल्या वर्गातील व्हायपर सापांचा अत्यंत दुर्मीळ साप केर-भेकुर्ली येथे दिसून आला. दक्षिण-पश्चिम भारत आणि श्रीलंका येथील स्थानिक प्रजाती आहे. या सापांचे लांबलचक सुळेदात भक्ष्याच्या शरीरात खोलवर दंश करून आतपर्यंत विष सोडतात. हे विष सहसा रक्तभिसरण संस्था आणि स्नायुंवर परिणाम करतात. 

या सापांचे शरीर जाडसर असते, लांबी सहसा कमी असून डोके काहीसे चपटे आणि त्रिकोणी असते. या सापांमध्ये सापांच्या तोंडावर असणारी दोन उष्णता संवेदनाग्रहण करणारी छिद्रे आजूबाजूला असलेल्या उष्ण रक्ताचे सस्तन प्राणी, पक्ष्यांची हालचाल सहज टिपू शकतात. आपले डोके आजूबाजूला फिरवून जाणवणाऱ्या उष्णतेप्रमाणे ते मध्याची योग्य दिशा सहज ओळखतात. या सापांच्या शरीरावर गडद तपकीरी किंवा राखाडी रंगाचे त्रिकोणी आकाराचे डाग असतात. 

हा साप इतर पिट व्हायपर सारखा हा झाडावर न राहाता खाली जमिनीवरच आढळतो. पालापाचोळ्यामध्ये झाडांच्या मुळांजवळ, दगडांखाली साप दिसून येतो. मात्र, हा साप अतिदाट जंगलात आढळतो. उत्तेजीत झाल्यावर तो आपली लालसर पिवळसर उठावदार रंगाच्या शेपटीची जोरदार हालचाल करतो. मादीला आकर्षित करण्यासाठीसुद्धा त्याला या सवयीचा उपयोग होतो.

यापूर्वी हा साप चोर्ला घाट, गोव्यातील केरी सत्तरी भाग तसेच ठराविक उंचीवर आढळून आला. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सापाची  पहिलीच नोंद आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here